कथा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची

song
पंधरा ऑगस्ट १९८८ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री श्री राजीव गांधी यांचे लाल किल्ल्यावरील भाषणाचे प्रसारण संपले आणि त्यानंतर एक सुंदर गीतरचना प्रसारित करण्यात आली. अनेक मातब्बर संगीत कलाकार, बॉलीवूड कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा सहभाग असलेली ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही अनेक भाषांमधील, विविधतेमध्येही देशाच्या एकतेचे प्रमाण देणारी रचना टीव्हीवर प्रसारित झाली आणि या रचनेच्या जादूने सर्वच देशवासियांना जणू मोहवून टाकले. पंडित भीमसेन जोशींसारख्या शास्त्रीय संगीतातील मातब्बर कलाकारांपासून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आणि अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांनी एकत्र येऊन साकारलेली ही रचना अतिशय लोकप्रिय ठरली. तेव्हापासून आजतागायत लाखो देशवासीयांच्या स्मृतींमध्ये अजरामर झालेल्या या रचनेशी निगडित काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.

या रचनेची कल्पना पूर्व पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे स्नेही जयदीप समर्थ यांची होती. समर्थ हे त्याकाळी अतिशय प्रसिद्ध जाहिरात कंपनीचे सीईओ म्हणून कार्यरत होते. ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या मदतीने पंडित भीमसेन जोशी यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतर भीमसेनजींनी भैरवी रागावर आधारित अतिशय सुंदर रचना तयार केली. त्यानंतर ही रचना निरनिराळ्या भाषाकारांकडे पाठविण्यात येऊन त्याचे त्या-त्या भाषांमध्ये अनुवाद करवून घेण्यात येऊन ही रचना संगीतबद्ध करण्यात आली. या रचनेमध्ये हिंदी, आसामी, गुजराती, मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, मारवाडी, ओडिया, बंगाली, सिंधी, तेलुगु, काश्मिरी आणि उर्दू भाषांचा समावेश आहे. याची शब्दरचना पंडित विनोद शर्मा यांची असून, अंतिम शब्दरचना तयार होईपर्यंत या रचेनेचे तब्बल अठरा निरनिराळे ड्राफ्ट लिहिले गेले होते.

सहा मिनिटांच्या या रचनेमध्ये संगीत, नृत्य, क्रीडा आणि अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. पंडित भीमसेन जोशी, एम बालमुरलीकृष्ण, लता मंगेशकर, कविता कृष्णमूर्ती या संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांच्या बरोबरच सुप्रसिद्ध नर्तकी मल्लिका साराभाई, कार्टुनिस्ट मारियो मिरांडा, चित्रपट निर्माते मृणाल सेन, आणि सुनील गंगोपाध्याय सारखे लेखकही या रचनेमध्ये दिसले आहेत. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या जोडीने क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग या रचनेमध्ये आहे.

या रचनेच्या सुरुवातीला एका कोसळणाऱ्या धबधब्याच्या पार्श्वभूमीवर पंडित भीमसेन जोशी गाताना दिसतात. हे चित्रीकरण कोडाईकनाल येथील पांबार फॉल्स येथे झाले असून, या धबधब्याला ‘लिरील फॉल्स’ म्हणूनही ओळखले जाते. लिरील साबणाची जाहिरात या धबधब्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झाली असल्याने या धबधब्याला लिरील फॉल्स असेही नाव मिळाले आहे. या रचनेमध्ये लता मंगेशकरांना सहभागी करून घेण्याची निर्मात्यांची मोठी इच्छा होती. पण तेव्हा लता मंगेशकर त्यांच्या कामानिमित्त सातत्याने प्रवास करीत होत्या आणि त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून या रचनेसाठी त्या वेळ काढू शकणे अवघड झाले होते. पण इतके व्यस्त शेड्युल असून, सातत्याने प्रवास करीत असतानाही लताबाई या रचनेच्या चित्रीकरणासाठी मुंबईला आल्या आणि ही रचना प्रसारित होण्यापूर्वी तीन दिवस आधी लताबाई सहभागी असलेल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले.

या रचनेमध्ये ताजमहालाचे हवाई दर्शन करविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आलाच, पण त्यासोबत नव्यानेच धावू लागलेली कोलकाता मेट्रो आणि पुणे व मुंबईकरांची लाडकी ‘दख्खनची राणी’ देखील यामध्ये सहभागी होती. या रचनेला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २६ जानेवारी २०१० साली या रचनेची नवी आवृत्ती ‘झूम टीव्ही’ च्या वतीने प्रसारित करण्यात आली, ही नवी रचना सोळा मिनिटांची असून, यामध्ये संगीत, क्रीडा, आणि अभिनय क्षेत्रातील नव्या पिढीचे कलाकार सहभागी झाले होते. ही रचना संगीतकार लुईस बँक्स यांनी संगीतबद्ध केली होती.

Leave a Comment