रेड झोन वगळता राज्यात जिल्हांतर्गत आजपासून एसटीची सेवा सुरु


मुंबई : राज्यात आजपासून रेडझोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता एसटीची जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे. एसटीची नॉन रेड झोनमध्येच जिल्हांतर्गत सेवा सुरु असेल. पण त्यासाठी असलेल्या अटी आणि शर्ती पाळत ही सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एसटीची सेवा सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना एसटी प्रवासादरम्यान काही नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

मुंबई व उपनगरात 23 मार्चपासून गेले दोन महिने अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. पण राज्य शासनाने लॉकडाऊनच्या चौथ्या कालावधीत रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन वगळता काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर आजपासून एसटी बस सेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

अशा प्रकारे सुरु होणार एसटीची सेवा

  • सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच जिल्हा-अंतर्गत ही बस सेवा सुरु राहणार आहे.
  • प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुक केलेल्या असतील.
  • सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. (साधारण एका बस मध्ये 20 ते 22 प्रवासी, एका सीटवर एकच प्रवासी )
  • ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून)
  • प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
  • प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

एसटी प्रवासाची नियमावली

  1. प्रवासाच्या माहिती नियंत्रण कक्ष सुरु करा
  2. एसटी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करा
  3. विविध विभागांशी संपर्क साधून प्रवासाचे मार्ग ठरवा
  4. प्रवाशांनी प्रवासाआधी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे
  5. प्रशासनाने प्रवाशाच्या प्रवासाची माहिती घ्यावी
  6. सोडण्यात येणाऱ्या बससाठी प्रवाशांचे गट करावे
  7. बस सुटण्याचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण असाच प्रवास असावा
  8. प्रवाशांना मधल्या थांब्यांबवर उतरता येणार नाही
  9. प्रवास सुरु होण्याआधी बसचे निर्जंतुकीकरण करावे
  10. प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घालणे अनिवार्य
  11. बसमध्ये प्रवेशाआधी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत
  12. प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड सादर करावे
  13. बसमध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे
  14. एका सीटवर एकच प्रवासी बसेल याची काळजी घ्यावी
  15. बसमधील प्रवाशांची ती प्रतींमध्ये यादी करावी
  16. प्रवासानंतर प्रवाशांना नोडल ऑफिसरच्या ताब्यात द्यावे
  17. आगार व्यवस्थापकांनी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी
  18. परतीच्या प्रवासाआधी बसचे निर्जंतुकीकरण करावे

Leave a Comment