ज्येष्ठ शास्त्रज्ञाने सर्वांच्या आशेवर सोडले पाणी ; लवकर कोरोनाची लस मिळेलच याची खात्री नाही


वॉशिग्टंग – कोरोना या महामारीसमोर अवघे जग हतबल झाले आहे. 2019च्या नोव्हेंबरमध्ये जन्माला आलेला हा व्हायरस हा हा म्हणता जगभरातील 213 देशांमध्ये पोहचला आणि संपूर्ण जगाची झोप उडवली. या व्हायरसमुळे जगातील अनेक देशांमध्ये भयावह परिस्थिती झाली आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधक औषध किंवा लस शोधण्याचे कामही अनेक देशांमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. पण अद्याप कोणत्याही देशाला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यातच आता कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने आगामीच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस मिळेलच याची खात्री देत येत नाही, असा इशारा दिला आहे.

सध्या संपूर्ण जगावर जीवघेण्या कोरोनाची दहशत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न अनेक देशांकडून सुरू असून, याविषयी अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञाने भूमिका मांडली आहे. या शास्त्रज्ञांचे नाव विलियम हेसलटाइन, असे आहे. कर्करोग, एचआयव्ही/एड्स आणि मानवी जीनोम प्रकल्पांसंदर्भात विलियम हे काम करतात. ‘रॉयटर्स’या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विलियम म्हणाले, आगामी काळात कोरोना प्रतिबंधक लस तयार होण शक्य नसल्यामुळे सर्वच देशांनी लॉकडाउन उठवताना किंवा शिथिल करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध तसेच स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा, असा सल्ला दिला.

कोरोनावर लस तयार करण्यात आली, तरी मी त्यावर अवलंबून राहणार नाही. कोरोना विषाणूच्या इतर प्रकारच्या लसी यापूर्वीही तयार करण्यात आल्या. पण, या लसी जेथून विषाणू शरीरात प्रवेश करतात, त्या नाकातील विशिष्ट त्वचेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे निष्पन्न झाल्याचे हेसलटाइन यांनी सांगितले. अमेरिकेतील निवडणूक येईपर्यंत आपल्याकडे लस तयार होईल, असे सांगणाऱ्या राजकीय नेत्यांचे बोलणे अजिबात ऐकू नका. कदाचित ती लस आपल्याला मिळेलही, पण हा काही जिंकण्याचा प्रकार नाही. कारण आपण सार्स आणि मेर्सवर लस शोधण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला, पण त्यावर पूर्णपणे सुरक्षाउपाय मिळू शकला नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान विलियम यांनी कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्ग सूचवला आहे. आपण लसीशिवाय इतर मार्गांनी कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो. नागरिकांनी त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करायला हवे. तोंडाला मास्क लावायला हवा, हात धुवायला हवेत, सोशल डिस्टन्सिग पाळायला हवे आणि स्वयं क्वारंटाइन आदी गोष्टींचे पालन करायला हवे, असे त्यांनी आवाहन केले आहे.

Leave a Comment