औरंगाबाद : राज्यातील वारकरी संप्रदायाला सध्या ओढावलेल्या कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे. माऊलीच्या पालखी सोहळ्याबाबत विश्वस्तांनी याबाबत राज्य सरकारला आता तीन नवे प्रस्ताव दिले आहेत. तसेच 2020 च्या वारीचे स्वरुप कसे असावे याबाबतचा आराखडा देखील राज्य सरकारला दिला आहे. यासंदर्भात मानाच्या पालखी आयोजकांनी काल एक महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी आषाढी वारीसाठी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता माऊलीच्या पालखी सोहळ्याबाबत विश्वस्तांनी तीन प्रस्ताव दिले आहेत.
विश्वस्तांकडून पालखी सोहळ्यासाठी सरकारला तीन प्रस्ताव, वारीसाठीचा आराखडाही सादर
माऊलीच्या पालखी सोहळ्याबाबत विश्वस्तांनी सादर केलेले प्रस्ताव
- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणार्या प्रत्येक दिंडीतील एका विणेकऱ्यासह सुमारे 400 वारकर्यांसह नेहमीच्या पध्दतीने श्री माऊलींच्या चल पादुका रथामध्ये विराजमान करुन सर्व वैभवासह सोहळा पार पाडणे.
- माऊलींच्या चल पादुका रथामध्ये वारकरी एकंदर केवळ 100 व्यक्तींसह विराजमान करुन सर्व वैभवासह सोहळा पार पाडणे.
- वारीची परंपरा खंडीत होऊ नये या दृष्टीने पायी प्रवास न करता श्री माऊलींच्या चल पादुका वाहनामध्ये श्री क्षेत्र पंढरीस घेऊन जाऊन 30 व्यक्तींसह सोहळा पार पाडणे.
जर राज्य सरकारने या पैकी कोणताही प्रस्ताव स्वीकारून सोहळ्यास परवानगी दिली तर संस्थान समिती त्याचा स्वीकार करेल असे संस्थान कमिटीचे विश्वस्त विकास ढगे यांनी सांगितले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, पोलिस व महसूल प्रशासन यांच्यापुढे यावर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद् गुरु तुकाराम महाराज तसेच इतर सर्व संतांच्या पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार का? त्याचे स्वरूप कसे? असे अनेक प्रश्न आहेत.
कोणा एका व्यक्तीकडे या प्रश्नांची सर्वमान्य उत्तरे असतील असे नाही, परंतु जर सर्वांनी प्रामाणिकपणे सामुदायिक प्रयत्न केले व सर्व वारीचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर प्रथा-परंपरेचेही पालन व्यवस्थितरित्या होईल तसेच स्थानिक प्रशासनावर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही याची दक्षता घेतली जाईल. केवळ यासाठी सर्वांचा योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे असे वाटते, असे विश्वस्तांचे म्हणणे आहे.
राजाभाऊ चोपदार यांनी महाराष्ट्रातील एकूणच सर्व पालख्यांसाठी 2020 आषाढी वारीचे स्वरूप कसे असावे? याबाबत प्रारुप आराखडा ही सरकारला दिला आहे.
राजाभाऊ चोपदार यांनी दिलेला प्रारुप आराखडा
- पंढरपूरमध्ये सध्या राहणाऱ्या एकूण नागरिकांची संख्या, सद्यपरिस्थितीमध्ये आपण संपूर्ण आरोग्य सुरक्षिततेचा विचार करून अजून किती नागरिकांना त्यांच्या उपलब्ध असलेल्या निवास व्यवस्थेमध्ये सहभाग करून घेऊ शकतो याची कमीत कमी संख्या सर्वप्रथम निर्धारित करणे गरजेचे असल्याचे आम्हाला वाटते. सदर सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वारकऱ्यांची गावाकडून निघाल्यानंतर तसेच पंढरपुरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आरोग्य तपासणी करणे बंधनकारक असावे.
- दरवर्षीप्रमाणे सदर सोहळ्यामध्ये भाविकांची संख्या लाखोंच्या प्रमाणात नसणार आहे, त्यामुळे अतिशय कमी निर्धारित केलेल्या संख्येनुसार पोलिसांच्या संख्येची गरजही कमी असणार आहे. वारकरी हे शिस्तबद्ध असल्यामुळे त्यांच्यावर अधिक ताण येईल, असे सध्यातरी वाटत नाही.
- वारकऱ्यांचे निर्धारित संख्येनुसार आवश्यक असणारा आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग तसेच वाहन व्यवस्था सदरील काळात करणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारी पोहोचण्यापूर्वी मुक्कामाच्या ठिकाणाचे निर्जंतुकीकरण तसेच पालखी सोहळा निघून गेल्यानंतर सदर जागेची पुन्हा निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.
- लॉकडाऊन काळामध्ये ज्या गावांमध्ये पालखी मुक्कामात जाणार आहे, त्या दिवशी त्या गावांमध्ये संपूर्ण म्हणजेच शंभर टक्के लॉकडाउन करणे गरजेचे आहे, यामुळे प्रत्येक गावांमध्ये निर्धारित केलेले दोनच प्रतिनिधी सर्व गावाच्या वतीने दर्शन घेतील त्याव्यतिरिक्त कोणीही संतांच्या प्रतिकाचे दर्शन घेणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
- पंढरपुरामध्ये प्रवेश करू शकणाऱ्या वारकऱ्यांची संख्या निर्धारित केल्यानंतर आपणास येणाऱ्या अधिकृत पालख्या व त्यांची पंढरपुरामध्ये असणारी निवास व्यवस्था यांची सांगड घालूनच प्रत्येकाला आपल्यासोबत मर्यादित भाविकांसह प्रवेश देणे शक्य होईल. त्यासंबंधीचा प्रत्येक पालखीबरोबर कमीतकमी किती लोक असावेत याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांनी योग्य त्या पातळीवर चर्चा केल्यास निश्चित स्वरूपाचा आराखडा देणे शक्य आहे.
- तसेच सर्व पालखी प्रमुखांशी संपर्क साधून यासंबंधी त्यांनाही अवगत करणे गरजेचे आहे.
- सरकारने काही टँकर्स व पाणी पुरवठा करणाऱ्या ठिकाणांची नेहमीप्रमाणे व्यवस्था करावी. जेवणाबाबत सर्व वारकऱ्यांनी आपापल्या परीने स्वयंपूर्ण असावे. कोणत्याही परिस्थितीत आपण प्रवास करीत असलेल्या कोणत्याही गावातील कोणत्याही व्यक्तींवर याबाबतीत अवलंबित राहू नये.
- या वर्षी आपापल्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक कोठेही जाहीर न करता ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे अशा ठिकाणी मार्ग बदलून पुढे जाण्याचे ठरवावे. शक्यतो कोणत्याही गावठाणामध्ये मुक्काम टाळावा. मोकळ्या पटांगणामध्ये मुक्काम करून आपल्या निघण्याच्या ही वेळा शक्य तेवढे पहाटे निघण्याचे ठरवावे.
- सदर पालखी सोहळा जात असताना त्याचे नित्य होणारे विधी, समाजारती, कीर्तन, जागर इत्यादी कार्यक्रमांचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून ते विविध माध्यमांना संबंधित पालखीमधील लोकांकडूनच वितरित केले जावे यासाठी कोणत्याही माध्यमांच्या प्रतिनिधींना सदर ठिकाणी वावर करू न देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- सदर चित्रीकरण पाहून सर्व वारकऱ्यांनी आपापल्या ठिकाणी सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचा अवलंब करीत आपापल्या घरीच वारीचा आनंद द्विगुणीत करावा.
- सर्व पालखी सोहळे नवमीच्या ऐवजी अष्टमी दिवशी वाखरी मुक्कामी पोहोचावेत व नवमी ते दशमी सकाळपर्यंत तेथे उपस्थित सर्व वारकऱ्यांची आवश्यक ती आरोग्य तपासणी त्याठिकाणी करून घ्यावी व जे वारकरी सुदृढ असतील, कोणत्याही रोगाची लक्षणे त्यांचेमध्ये नसतील अशाच वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा व इतरांना पंढरपूरमध्ये प्रवेश देऊ नये.
- वारीमध्ये प्रवेश करू इच्छिणार्या वारकऱ्यांची वयोमर्यादा साठ वर्षे वयापेक्षा अधिक नसावी.
- सदर सर्व गोष्टींचा समन्वय साधण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या वतीने एक अधिकारी समन्वयक व सोबत चार कर्मचारी नेमणे गरजेचे वाटते.
राज्य सरकारला आमचे हे विचार योग्य वाटत असतील तर ठिकच, नसल्यास यामध्ये काही बदल सरकार आम्हास सूचवत असल्यास आम्ही ते अत्यानंदाने स्वीकारू. वारीसाठी आमची नेहमीच लवचिक भूमिका राहिली आहे. याविषयी आणखी काही मुद्यांवर दृष्टीक्षेप टाकू इच्छितो, असे देखील विश्वस्तांनी म्हटले आहे.
पालखी सोहळ्यासाठी विश्वस्तांनी सुचवलेले आणखी काही महत्वाचे मुद्दे
- प्रस्थान मर्यादित, साधेपणाने करून प्रथा परंपरांचे पालन करून ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीतच मुक्काम असावा.
- अष्टमी ते त्रयोदशी अथवा चतुर्दशीपर्यंत संत प्रतिकांचा मुक्काम आळंदी येथेच असावा.
- त्यानंतर पहाटे पादुकांचे प्रस्थान करून पादुका आषाढ शुद्ध अष्टमीला वाखरीला पोहोचतील असे मार्गक्रमण करावे.
- रोज साधारण 25 किमीची चाल असावी. पहाटेच्या टप्प्यात १५ कि. मी. आणि दुपारच्या टप्प्यात १० कि. मी. ची चाल असावी.
- आवश्यकता वाटल्यास रथ, पालखी, घोडे असा लवाजमा टाळून पादुका डोक्यावर घेऊन प्रवास केला जाऊ शकतो का? याचाही विचार करावा.
- वाटचालीतील वारकऱ्यांकडे कोरोना तपासणी करून त्यासंबंधीचा योग्य तो अहवाल असणे आवश्यक असेल.
- जे नियंत्रित/मर्यादित वारकरी समाविष्ट असतील त्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जावे. त्यांचे वय शक्यतो ६०पेक्षा अधिक नसावे.
- दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी अथवा मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांनी कुठल्याही स्थानिक व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये.
- वाटचालीतील मुक्काम हा शक्यतो शाळेत अथवा मंदिरात असावा. मुक्कामाच्या पूर्वी आणि नंतर संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करावा.
- इतर छोटे विसावे हे गाव सोडून करावेत.
- या वर्षीपुरते रिंगण सोहळे रद्द करून तेथील ठिकाणी परंपरेप्रमाणे आरती, उडी आदि सोपस्कार औपचारिक पूर्ण करावेत.
- शासन मान्य करेल त्याप्रमाणे वारकऱ्यांची संख्या निश्चित करावी.संख्येप्रमाणे भजनी २ किंवा ३ गट निश्चित करावे. जितके भजनी गट तितके विणेकरी, पखवाज, काही झेंडेधारी, भोपळे आणि गोऱ्हेकर यांचा ध्वज तसेच शितोळे सरकार यांचा ध्वज हे अंतर्भूत असावेत.
- साधारण जितके पायी चालणारे वारकरी असतील त्याच्या१५% व्यक्ती हे वाहनातून व्यवस्थापनासाठी असावेत.
- फक्त पहाटपूजेला स्थानिक दोन व्यक्तींना पूजेला प्रातिनिधिक प्रवेश दयावा.त्यांच्याकडे कोरोनाबाधित नसलेले प्रमाणप्रत आवश्यक असावे.
- शासनाने अवांतर स्थानिक लोकांनी सोहोळ्यातील लोकांशी संपर्कात येऊ नये ही जबाबदारी पार पाडावी.
- वाहनांची संख्या मर्यादित असावी, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, निर्जंतुकीकरण करणारी दोन वाहने,टँकर आणि इतर मर्यादित वाहनेही अंतर्भूत असावी.
- नाश्ता पॅकेट्स मुबलक प्रमाणात असावीत कारण कोणीही वारकरी वाटचालीत उपाशी राहू नये ही काळजी घ्यावी.
- सर्व खर्चाची जबाबदारी सरकार, संस्थान आणि लोकसहभागातून विभागून घ्यावी.