ट्विटरवर ट्रेंड होत आहे ‘महाराष्ट्रद्रोही BJP’ हॅशटॅग


मुंबई : जीवघेण्या कोरोना व्हायरसने पूर्ण देशाला विळखा घातला आहे. त्यातच कोरोनाचे सर्वाधिक महाराष्ट्रात सापडले आहेत. पण राज्यावर कोरोनाचे आलेले संकट रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला अपयश आल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरात सरकारविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभे राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन निषेध नोंदवावा, असे आवाहन केले होते. हे निषेध आंदोलन ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत करण्यात आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रद्रोही भाजप असे आंदोलन सुरु केले असून सध्या ट्विटरवर महाराष्ट्रद्रोही BJP हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. या हॅशटॅग अंतर्गत आतापर्यंत 54 हजाराहून अधिक ट्विट करण्यात आली आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

त्यावर राज्य सरकारकडून वारंवार संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा, असे सांगितले जात असल्यामुळे आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केले. पण आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नसल्याचे सांगतानाच ठाकरे सरकारचे अपयश आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिल्याचे पाटील यांनी सांगितले होते.

दरम्यान भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले असून सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभे राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केले आहे.

Leave a Comment