रोहित पवारांची भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनावर खोचक टीका


मुंबई : आज राज्यभरात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोरोना विरोधातील लढाई गांभीर्याने घेत नसल्यामुळे राज्तील सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.


दरम्यान भाजपच्या या आंदोलनाची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. आधी म्हणायचे ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ आणि आता ‘महाराष्ट्र बचाव’चे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. त्याचबरोबर अरे किती हिणवणार? रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कोरोना योद्धांचा आंदोलनाच्या नावाने अपमान तरी करू नका. राज्याचा एवढाच कळवळा आहे तर संकटात तरी एकदिलाने काम करत #महाराष्ट्रघडवूया!, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

आज भारतीय जनता पक्षांतर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या आवारातच काळ्या फिती लावून आणि सरकारला आवाहन करणारे फलक लावून आंदोलन करण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या आंदोलनात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरात आंदोलन करणार आहेत.

Leave a Comment