भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ला आदित्य ठाकरेंचे हटके प्रत्युत्तर


मुंबई: देशासह राज्याभोवती कोरोनाने आवळलेला फार्स काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यातच विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे शांत असलेले राजकीय वातावरण आता या कोरोनामुळे पेटायला लागले आहे. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचे म्हणत भारतीय जनता पक्षाने आजपासून महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनाला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार असे अनेक महत्त्वाचे नेते ‘महाराष्ट्र बचाव’ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आता या आंदोलनाला सत्ताधारी पक्षांकडूनही प्रत्युत्तर म्हणून भाजपला लक्ष्य केले जात आहे. त्यातच आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या हटके प्रत्युत्तराची चर्चा आहे.


आदित्य ठाकरेंनी भाजपच्या या आंदोलनासंदर्भातला एक फोटो ट्विट करत राज्यातील नेत्यांकडून अत्यंत लज्जास्पद राजकारण केले जात आहे. भर उन्हात लहान मुलांना उभे करून तोंडावरचे मास्कही खाली करायला सांगून अशा आंदोलनाचे फोटो काढणे लज्जास्पद आहे. त्यांनी भाजपच्या या राजकारणाला शेमफुल म्हटले आहे. आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, घरात लहान मुलांना सुरक्षित ठेवायचे सोडून असे रस्त्यावर उभे केले जात आहे. तसेच त्यांनी कोरोना को भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है, असेही म्हटले आहे.

कोरोना प्रादुर्भाव महाराष्ट्रातही सातत्याने वाढत असतानाच राज्यातील राजकारणही पेटत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने शुक्रवारी ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन सुरुवात केली आहे. ‘माझ अंगण माझे रणांगण’ अंतर्गत राज्य सरकार विरुद्ध भाजपने पुकारलेल्या आंदोलनात अनेक बड्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र बचावसाठी सकाळी 11 ते 12 या वेळात कार्यकर्ते आपल्या घरासमोर काळे मास्क, भाजपचे झेंडे व हातामध्ये बॅनर घेत सरकारचा निषेध केला.

तर याला ‘भाजप बचाओ’ आंदोलन असे सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेसने म्हटले आहे. महाविकास आघाडीने या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ‘महाराष्ट्रद्रोही भाजप’ असे आंदोलन सुरू केले आहे. सध्या ट्विटरवर महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड सुरू केला आहे.

Leave a Comment