करोना लस, अमेरिकेकडून ३० कोटी डोस खरेदी

फोटो साभार जागरण

करोनावरील लस किती प्रभावी हे सिध्द होण्याच्या अगोदरच अमेरिकेने ब्रिटीश फार्मा कंपनी एक्स्ट्राजेनेका कडून ३० कोटी व्हॅक्सिन खरेदीचा सौदा केला असल्याचे समजते. अमेरिकेने १.२ अब्ज डॉलर्स म्हणजे ९ हजार कोटी रुपये त्यासाठी मोजले असून हा खरेदी करार केला असल्याचे अमेरिकेचे आरोग्य मंत्री एलेक्स अजर यांनी सांगितले.

जगभर फैलाव झालेल्या आणि विविध उपाय योजूनही पूर्ण नियंत्रणात येत नसलेला करोना साठी लस हाच एकमात्र प्रभावी उपाय समजला जाऊ लागला आहे. परिणामी डझनावारी कंपन्या करोना लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. अमेरिकेने खरेदी केलेली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केली असून ती बनविण्याचा परवाना एक्स्ट्राजेनेका कंपनीला दिला गेला आहे.

अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यांच्या मतानुसार हा अतिशय महत्वाचा सौदा असून २०२१ पर्यंत या लसीची उपयुक्तता किंवा प्रभावीपणा समजण्यास मदत होणार आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी अमेरिकेत ३० हजार लोकांवर परीक्षणे केली जाणार आहेत. या लसीच्या पहिल्या दोन चाचण्या गेल्या महिन्यात झाल्या असून त्यात १८ ते ५५ वयोगटातील लोकांना ही लस दिली गेली होती. कोविड १९ साठी कारणीभूत असलेल्या करोना विषाणूवर तिचा प्रभाव अद्याप सिद्ध झालेला नाही. या लसीचे नामकरण एजेडी – १२२२ असे असून ब्रिटनने सुद्धा या लसीचे १० कोटी डोस खरेदी करण्याचा सौदा केल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment