करोनाच्या आकाराच्या गारा पडल्याने घबराट

फोटो साभार एमबीएस न्यूज

गेले अनेक दिवस जगातील बहुतेक सारे देश आणि नागरिकांना वेठीला धरलेल्या करोना बाबत आता लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असतानाचा मेक्सिको मध्ये एक विचित्रच प्रकार घडला आहे. त्यामुळे तेथील लोक अधिक घाबरले असून हा ईश्वरी कोप असावा अशी भीती व्यक्त करत आहेत. मेक्सिकोच्या न्यूवोलियोन राज्यात मोंटमोरेलेस या गावात पावसाबरोबर गारा पडल्या. आता गारांचा पाउस पडणे नेहमीचे दृश्य असले तरी येथे पडलेल्या गारा करोना विषाणूच्या आकाराप्रमाणे होत्या त्यामुळे एकच घबराट झाली.

रिपोर्ट नुसार हा गारांचा पाऊस बराच काळ पडला. सुरवातीला लोकांनी रस्त्यावर त्याचा आनंद लुटला पण जेव्हा गारांचा आकार करोना विषाणू सारखा आहे असे दिसले तेव्हा मात्र तर्कवितर्क सुरु झाले. स्थानिक लोकांच्या मते हा ईश्वराने दिलेला इशारा असून ईश्वरी कोपाचे संकेत आहेत. हवामान तज्ञ मात्र याचा खुलासा करताना म्हणाले, अनेकदा बर्फाचे बारीक तुकडे चक्राकार गतीने खाली येत असतील तर एकमेकांना चिकटतात आणि असा आकार बनू शकतो.

करोना साथीचा प्रभाव मेक्सिको मध्ये वाढत चालला असतानाचा हा प्रकार घडल्यामुळे स्थानिक धास्तावले आणि त्यांनी घरातच थांबणे पसंत केले. मेक्सिको मध्ये ५४३४६ करोना संक्रमित आढळले असून एकच दिवसात २७१३ पॉझीटीव्ह केसेस समोर आल्या आहेत.

Leave a Comment