कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल; बाधितांचा आकडा 51 लाखांच्या जवळ


मुंबई : जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरसच्या संकटापुढे हतबल झाले असून या देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. जगभरात जवळपास 51 लाख कोरोनाबाधित झाले आहेत. जगातील 213 देशांमध्ये मागील 24 तासात 99,685 नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोनामुळे 4,738 लोकांचा बळी गेला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यूंची संख्या जगभरात 3 लाख 29 हजार 292 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर जगभरात 20 लाख 20 हजार 151 जणांनी या जीवघेण्या आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत कोरोनाबाधितांच्या बाबतीत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे 112,028 रुग्ण, तर कोरोनामुळे 3,434 बळी गेले आहेत. सध्या भारतात 59,028 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 41,968 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

जगात कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

कोरोनाचा सर्वाधिक फटका महासत्ता अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 15,91,953 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 94,992 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,704 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,48,293 एवढी आहे. तर स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,888 लोकांचा मृत्यू झाला आहे. 279,524 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,330 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,27,364 एवढा आहे.

जगभरात अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे. हा आकडा एकट्या अमेरिकेत 94 हजारांवर गेला आहे.

Leave a Comment