स्विगीच्या घरपोच दारु सेवेला सुरुवात


नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरु असून केंद्र सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर मद्यविक्रीच्या दुकांनांबाहेर अनेक ठिकाणी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. परंतु त्यानंतर सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे आणि दुकानांबाहेरील गर्दी कमी व्हावी यासाठी अनेक राज्यांनी ऑनलाइन मद्यविक्रीला सुरूवात केल्यानंतर घरपोच मद्यविक्रीसाठी स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांनी परवानगी मागितली होती. दरम्यान, झारखंडमधील रांचीमध्ये आजपासून स्विगीने घरपोच मद्यविक्रीला सुरूवात केली आहे.

आपल्या अॅपमध्ये स्विगीने वाईन शॉप्स ही कॅटेगरी सुरू केली असून त्याद्वारे ऑर्डर करणाऱ्यांना घरपोच मद्य पोहोचवले जाणार आहे. झारखंडमधील रांची येथे ही सेवा सध्या सुरू करण्यात आली असून हळूहळू राज्यातील अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे स्विगीकडून सांगण्यात आले. यासंदर्भातील वृत्त ईकॉनॉमिक टाईम्सने दिले असून दुसरीकडे घरपोच मद्य पोहोचवण्याची सेवा झोमॅटोही देणार असून त्यांची ही सेवा उद्यापासून रांचीमध्ये सुरू होणार आहे. तसेच अन्य शहरातही येत्या काही दिवसांमध्ये या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना झोमॅटोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले की, आमचा विश्वास आहे की तंत्रज्ञानाच्या मदतीनं पुरवल्या जाणाऱ्या सेवेमुळे व्यक्ती ठराविक प्रमाणात मद्याचे सेवन करतील. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सोशल डिस्टंन्सिंगसाठीही तो एक पर्याय ठरू शकतो. सध्या झारखंड सरकारकडून यासाठी स्विगीला आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर अन्य राज्य सरकारांशीदेखील सध्या आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

स्विगीचे उपाध्यक्ष (प्रोटक्ट्स) अनुज राठी यांनी यावर म्हटले की, दुकानांबाहेर होणाऱ्या गर्दीला सुरक्षित आणि जबाबदार पद्धतीने घरपोच मद्यविक्री करून आळा घालू शकतो. त्याचबरोबर किरकोळ मद्यविक्रीच्या दुकानांचा व्यवसायही वाढवू शकतो. त्याचबरोबर या घरपोच मद्यविक्री करताना नियमांची योग्य ती काळजी घेण्यात येणार असून ग्राहकांना वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. ऑर्डर करताना ग्राहकांना त्यांच्या सेल्फीसह आयडी प्रुफही अपलोड करावा लागणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच ग्राहकांना घरपोच सेवा घेताना मिळालेला ओटीपीदेखील व्हेरिफाय करावा लागणार आहे. मद्याच्या ऑर्डरवर मर्यादा ठेवण्यासाठी हे केले जात असल्याचेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment