पुण्यातही यंदा साधेपणात साजरा होणार सार्वजनिक गणेशोत्सव


पुणे – यंदाच्या वर्षी कोरोनामुळे राज्यात उद्भवलेले संकट लक्षात घेता, संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शहरातील मानाचे पाच गणेश मंडळ आणि इतर मंडळाच्या अध्यक्षांची आज व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, सौरभ धडफळे, केशव नेउरगांवकर, अनिरुद्ध गाडगीळ, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविणशेठ परदेशी, राजू परदेशी, पृथ्वीराज परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, नितीन पंडीत, विकास पवार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी आदी या बैठकीला उपस्थित होते.

दरवर्षीच्या पद्धतीने यंदाच्या गणेशोत्सवात उत्सवमंडप उभारून अथर्वशीर्ष पठण, पूजा-अर्चा, आरती, गणेशयाग, मंत्र-जागर असे धार्मिक कार्यक्रम सालाबादप्रमाणे पार पडतील. पण अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीविषयीचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार आणि समाजहित लक्षात घेऊन घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर यादरम्यान सरकार आणि स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम आणि शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर कोणीही आपल्या गणरायाला आगामी गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये, जेणेकरून पावित्र्य भंग होईल. असे आवाहन यावेळी गणेश मंडळ, नागरिक, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले.

Leave a Comment