अखेर वुहानमधील विक्षिप्त खाद्यपदार्थांवर बंदी


चीनच्या ज्या शहरात कोरोना या जीवघेण्या रोगाचा जन्म झाला, त्या वुहान शहरात विक्षिप्त खाद्यपदार्थ खाण्यावर चीनने बंदी घातली आहे, वुहान सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार हे नवीन धोरण पुढील पाच वर्षांसाठी कायम राहील.

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार वुहान सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात एक नवीन नियमावली जारी करण्यात आली असून त्यानुसार वुहानमध्ये वन्य प्राण्यांच्या खाण्यावर आणि शिकार करण्यास बंदी आहे.

आदेशानुसार सर्व वन्यजीव आणि त्यापासून बनणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या यादीमध्ये राष्ट्रीय आणि हुबेई प्रांतीय संवर्धन याद्यांमधील सर्व वन्यजीव प्राण्यांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीय महत्वाच्या संरक्षणाखाली मौल्यवान जलचर वन्य प्राणी आणि संकटात सापडलेल्या जलचर वन्य प्राण्यांचा देखील समावेश आहे.

या आदेशासह वुहानमध्ये कोल्हा, मगर, लांडगा, साप, उंदीर, मोर यासह अनेक वन्य प्राणी खाण्यास 5 वर्षांची बंदी आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला वन्यजीव किंवा संबंधित उत्पादनांचे उत्पादन, प्रक्रिया, वापर किंवा व्यावसायिक ऑपरेशन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

चीनमधील खाद्य संस्कृतीमध्ये सर्वाधिक पसंत असलेल्या जनावरांवर वुहानमध्ये घातलेल्या या बंदीनंतर आता असे मानले जात आहे की मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या वुहान शहरात यावर बंदी घालणे हे एक मोठे पाऊल आहे.

दरम्यान चीनमधील वुहान, जेथे सुरुवातीपासूनच कोरोना पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. वुहानमधील वेट मार्केट हे बंद करण्याची निर्णय चीनने जानेवारीतच घेतला आणि तेथील वन्यजीवांच्या व्यापार आणि वापरावर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश चीनने दिले होते.

वुहानमधील वेट मार्केट ही एक अशी बाजारपेठ आहे, जी अजगर, कासव, पाल, उंदीर, बिबट्याचे बछडे, वटवाघुळ, पेंगोलिन, कोल्ह्याची पिल्ले, वन्य मांजरी, मगर अशा प्राण्यांचे मांस विकले जाते. येथूनच कोरानाचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

एकंदरीत, कोरोना विषाणू सध्या जगात सर्वत्र पसरलेला आहे, परंतु सत्य हे आहे की सुरुवातीला चीनमध्ये त्याचा प्रसार झाला आणि अन्य पाहता पाहता तो इतर देशांमध्ये पोहचला. आता त्यावर कसे आणि किती काळात नियंत्रण मिळवणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment