सावधान ! कोरोनाच्या नावाखाली चोरी होत आहे आर्थिक माहिती – सीबीआय

कोव्हिड-19 च्या नावाखाली सर्बेरस नावाचे सॉफ्टवेअर क्रेडिट कार्डसारखी आर्थिक माहिती चोरी करत असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिली आहे. सीबीआयने या संदर्भात राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना याबाबत सावध केले असून, इंटरपोल इनपूटच्या आधारावर सीबीआयने ही माहिती दिली आहे.

ट्रोजन व्हायरस युजर्सला स्मार्टफोनवर मेसेज पाठवते व त्यासोबत कोव्हिड-19 ची माहितीसाठी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगते. या लिंकवर क्लिक करताच फोनमध्ये मेलेशियस सॉफ्टवेअर इंस्टॉल होते व ते खाजगी आर्थिक माहिती चोरी करते.

एजेंसीनुसार, इंटरपोलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर सीबीआयने सर्बेरस नावाने ओळखल्या जाणाऱ्या बँकिंग ट्रोजनसंबंधी अलर्ट जारी केले आहे. हे मेलेशियस सॉफ्टवेअर कोव्हिड-19 संबंधीत माहिती डाऊनलोड करण्यास सांगत मेसेज पाठवते. या लिंकद्वारे मेलेशियस सॉफ्टवेअर इंस्टॉल होते. ट्रोजनचा मुख्य उद्देश हा क्रेडिट कार्डसारखा आर्थिक डेटा चोरी करणे हा असतो. सोबतच हा व्हायरस युजरची  खाजगी माहिती आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन माहिती देखील चोरी करू शकते.

याआधी देखील सीबीआयने 7 एप्रिलला देशभरातील पोलीस विभागाने हॉस्पिटल आणि आरोग्य संस्थांवरील सायबर हल्ल्यांबाबत सावध केले होते.

Leave a Comment