चिंताजनक ! देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने ओलांडला एक लाखाचा टप्पा


नवी दिल्ली – आपल्या देशात कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. त्यातच आता देशवासियांची चिंता वाढवणारी एक बातमी आहे. ती म्हणजे देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. या संदर्भात आज सकाळीच आरोग्य मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. देशभरात मागील २४ तासांत कोरोनाची बाधा झालेली ४९७० नवीन रुग्ण आढळले आहेत तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या आठ दिवसात विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलेल्यांचा समावेश आहे. देशांतर्गत सुरु असलेल्या या स्थलांतरामुळे शहरातील कोरोना आता ग्रामीण भागात देखील पोहचल्याचे चित्र आहे.

देशातील ३६,८२४ जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून हे प्रमाण ३८.२९ टक्के आहे. मागील २४ तासांत २७१५ रुग्ण बरे झाले आहेत. तर देशातील ३१६३ जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली या चार राज्यांत आढळले आहेत. गेल्या आठवडय़ाभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रतिदिन सुमारे तीन ते चार हजारांची वाढ झाली. रविवारी चोवीस तासांतील रुग्णसंख्या पाच हजारांसमीप होती. ती सोमवारी एका दिवसात पाच हजारांहून अधिक नोंदवली गेली. देशातील मोठ्या शहराची परिस्थिती चिंताजनक असून एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील आहेत. या पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास ५०हजार आहे.

तर महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत आणखी २,०३३ नवीन रुग्णांची वाढ झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. तर राज्यातील ८,४३७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

Leave a Comment