खुशखबर…! कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी अमेरिकेत यशस्वी


वॉशिंग्टन – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी आजवर कोणतेच औषध अथवा लस आलेली नव्हती. पण अमेरिकेत या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीची मानवी चाचणी करण्यात आली असून अमेरिकेतील या पहिल्या चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. या लसीची चाचणी ज्यांच्यावर करण्यात आली त्यांच्या शरीरात याचे कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत तसेच कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढल्याचे ही लस विकसित करणाऱ्या मोडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले.

ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून काढण्यात आला आहे. या चाचण्या मार्चपासून सुरु झाल्या होत्या. लसीचे दोन डोस आठ स्वयंसेवकांना देण्यात आले. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात तयार झालेल्या अ‍ॅंटीबॉडीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे व्हायरसचा शरीरात होणारा फैलाव रोखण्यामध्ये ही लस अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले. प्रभावी लसीसाठी हीच सर्वात महत्वाची गोष्ट होती.

मोडर्ना कंपनी दुसऱ्या टप्प्यात ६०० निरोगी आणि तंदुरुस्त स्वयंसेवकांवर mRNA-1273 लसीची चाचणी करणार आहे. ६०० स्वयंसेवकांपैकी अर्धे १८ ते ५५ वयोगटातील तर उर्वरित ५५ च्या पुढच्या वयोगटातील असतील. कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला mRNA-1273 लसीद्वारे चालना देण्यात येईल. या लसीची जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्यात १ हजार लोकांवर चाचणी करण्यात येईल. मोडर्नाला दुसऱ्या फेजसाठी एफडीएने परवानगी दिली आहे.

अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) कोरोना प्रतिबंधक लस संशोधन करणाऱ्या मोडर्ना थेराप्युटीक्सला जलदगतीने आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकन कंपनी सुद्धा लवकरच लसीच्या मानवी चाचण्या सुरु करणार आहे. सध्याच्या घडीला कोरोना प्रतिबंधक लस सर्वांसाठीच महत्वाची आहे. जगात जवळपास १०० संशोधकांचे गट कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी संशोधन करत आहेत. संशोधन ते क्लिनिकल चाचण्या अशा वेगवेगळया टप्प्यांवर हे लस प्रकल्प आहेत.

Leave a Comment