… म्हणून पोलिसांनी चौकीतच भरवली लहान मुलांची शाळा

लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे काहीजण ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास करत आहे. अशाच काही लहान मुलांना शिकवण्यासाठी दिल्ली पोलीस पुढे आले आहेत. दिल्लीच्या ग्रेट कैलाश येथील काही मुलांचे पालक लॉकडाऊनमुळे घरी परतू न शकल्याने पोलीस या लहान मुलांना पोलीस स्टेशनला घेऊन आले व त्यांना शिकवण्यास सुरूवात केली. यातील दोन मुली पहिली व चौथीच्या वर्गात कैलाश कॉलनीतील एमसीडी आदर्श शाळेत शिकतात. तर अन्य तीन मुलांचा शाळेत जाण्याचा पहिलाच अनुभव आहे. या 5 मुलांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी स्टेशनमध्येच शाळा सुरू करत त्यांना शिकवण्यास सुरूवात केली आहे.

हेड कॉन्स्टेबल तारा चंद आणि नीलम हे रोज या मुलांना शिकवतात. कर्मचारी 10 एप्रिलपासून दररोज त्यांना 1 तास विविध गोष्टी शिकवत आहेत. सुरूवातीला पालकांनी मुलांना शिकवण्यास नकार दिला होता, मात्र अखेर ते तयार झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील यासाठी बोर्ड, पुस्तक आणि अन्य गोष्टी उपलब्ध करून दिल्या. 10 एप्रिलला पोलीस गरजूंना जेवण वाटत असताना त्यांना या लहान मुलांबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर कर्मचारी या लहान मुलांना स्टेशनला घेऊन आले व त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

Leave a Comment