देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या उंबरठ्यावर


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली असून त्यानुसार आजपासून देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. पण देशातील कोरोना बाधितांची संख्या लॉकडाऊननंतरही वाढत आहे. मागील 24 तासांत देशात नवे 5242 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जे एका दिवसात आतापर्यंतचे आढळून आलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 96 हजार 169 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आजपर्यंत 3029 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 36 हजार 824 लोकांनी जीवघेण्या कोरोनावर मात केली आहे. दरम्यान देशातील कोरोना बाधितांचा आकडा 96 हजाराच्या पार झाला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर मागील तीन दिवसांमध्ये 13.6 दिवसांवर आला आहे. तर मागील 14 दिवसांत हा दर 11.5 वर होता. देशात रविवारी कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, मृत्यूदरात घट होऊन 3.1 टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर 37.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.

106 दिवसांमध्ये देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजारांवर पोहोचली आहे. तर या संख्येजवळ पोहोचण्यासाठी ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमेरिकेला 44 ते 66 दिवस लागले होते. आठ राज्यात आणि केंद्र शासित प्रदेश तसेच, अरुणाचल प्रदेश, चंदिगढ, लडाख, मेघालय, मिझोरम, पद्दुचेरी आणि अंदमान निकोबार द्वीप समूह आणि ददरा आणि नगर हवेलीमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचा कोणताही रुग्ण समोर आलेला नाही. सिक्किम, नागालँड, दमन आणि दीव, लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

Leave a Comment