‘हे’ पाच मंत्री ठेवणार मोदींनी जाहिर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीवर लक्ष


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरसमुळे डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहिर केले होते. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषद घेत या पॅकेजची सविस्तर माहिती देशातील जनतेला दिली होती. त्यानंतर आता मोदी यांनी जाहिर केलेल्या या पॅकेज आणि उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे.

यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एक अनौपचारिक मंत्रिगट या पॅकेजवर लक्ष ठेवणार असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह त्याचे नेतृत्व करणार आहेत. तर या पाच जणांच्या टीममध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि नागरी उड्डयण मंत्री हरदीप पुरी यांचा समावेश करण्यात आला आहे.

देशाची डळमळीत झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सलग पाच दिवसा पॅकेजची तपशीलवार माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. त्यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिदेत एकूण पॅकेज २१ लाख कोटींच्या घरात कसे जाते, याचा ताळेबंदही सादर केला होता. त्यानंतर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच जणांच्या मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. आता लवकरच त्यांची एक बैठक पार पडणार आहे.

Leave a Comment