निर्मला सीतारमन यांच्या ‘ड्रामेबाजी’ला आता आव्हाडांचे उत्तर


मुंबई : काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जाऊन ड्रामेबाजी करत असल्याची टीका केली होती. त्याला आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील उत्तर दिले आहे. जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ही ड्रामा बाजी असेल, तर ड्रामा करणाऱ्यांचा हा देश असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.


स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर चालणे.. राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे. जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे, तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होतेच, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारांना स्थलांतरितांसाठी ट्रेन मागवा, असे का सांगत नाही? स्थलांतरित मजुरांचा रस्ता अडवून त्यांच्याशी बातचीत करुन राजकारण करायची ही वेळ आहे का? मग ड्रामेबाज कोण आहे?’ असा सवाल सीतारमन यांनी उपस्थित केला होता. स्थलांतरित मजूर हवालदिल होऊन रस्त्यावर पायी जात असतील तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जा. त्यांना आपल्या गावी सोडण्यासाठी केंद्राकडून ट्रेन मागवा. तुम्ही सांगाल तिथे तीन तासांत रेल्वे दाखल होईल. त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी बातचीत करुन त्यांचा प्रश्न सुटणार नाही. अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या मजुरांसोबत चालत जावे, त्यांची सूटकेस उचलावी. हे मला अत्यंत दु:खी होऊन व्यक्त करावे लागत असल्याचा घणाघात निर्मला सीतारमन यांनी केला होता.

Leave a Comment