लॉकडाउन 4.0 : केंद्रीय गृहमंत्रालयाची नियमावली जारी


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यास सहा तास शिल्लक असतानाच सरकारने रविवारी पुन्हा त्यात वाढ करण्याची घोषणा केली. सरकारच्या नवीन आदेशानुसार लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काहीसा दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालये, कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्र टप्प्यात उघडली जाऊ शकतात. यासंदर्भातील वृत्त अमर उजालाने दिले आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात देखील हवाई प्रवासाप्रमाणेच मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर मोठ्या संख्येने गर्दी जमा होईल अशी ठिकाणे म्हणजेच शॉपिंग मॉल्स आणि थिएटर हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.

रात्री 7 ते सकाळी 7 या वेळेत पूर्णतः संचारबंदी असेल त्याचबरोबर 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुलांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच ज्या राज्यांना सार्वजनिक वाहतुक पुन्हा सुरू करायची असेल तर ते करू शकतात. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांमध्ये आंतरराज्यीय बस सेवांना परवानगी देण्यात आली आहे, पण त्याला सहभागी राज्यांनी त्यांची संमती दिली असेल तरच ही सेवा सुरु करता येऊ शकते.

याव्यतिरिक्त, सरकारने केशकर्तनालय आणि ई-कॉमर्स साइटवरील निर्बंध देखील हटवले आहेत. तथापि, ही सूट सर्वच राज्यांना लागू होणार नाही. केंद्र सरकारने कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत देशातील राज्यांना महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत. ज्यानुसार राज्य सरकार ग्रीन, ऑरेंज किंवा रेड झोन म्हणून चिन्हांकित केलेली क्षेत्रे ठरवू शकतात. राज्य सरकारांना या भागात निर्बंध आणण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये शॉपिंग मॉल्स सुरू करण्याच्या मागणीला परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु उर्वरित उद्योगधंदे कधी सुरु करण्याचे अधिकार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे असतील.

Leave a Comment