वाधवान कुटुंबियांची महाबळेश्वर वारी घडवणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत रुजू!


मुंबई: प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी लॉकडाऊनच्या काळात येस बँक, डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान बंधुंच्या कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पण तेच गुप्ता आता पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. एप्रिल महिन्यातील लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवासावर बंदी होती. पण त्याच दरम्यान वाधवान कुटुंबासह २३ जणांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र दाखवले होते.

या घटनेची माहिती माध्यमांनी समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच फैलावर घेतले होते. अखेर अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही दिले होते. अमिताभ गुप्ता यांना चौकशी समितीने निर्दोष ठरवल्यामुळे त्यांना पुन्हा प्रधान सचिव पदावर रुजू करुन घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

पण आता महिन्याभरानंतर पुन्हा आपल्या कामावर अमिताभ गुप्ता रुजू झाले आहेत. यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. पुन्हा त्याच पदावर अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती होणे म्हणजे वाधवान बंधुंना सरकार किंवा सरकार चालवणाऱ्यांकडूनच पास देण्यात आला होता, हे स्पष्ट होते. हे आघाडी सरकार आहे का वाधवान सरकार? या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Leave a Comment