चीनविरोधात भारतासह एकवटले ६२ देश; आरोग्य संघटनेत मांडणार ठराव


नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्राण्यांमधून सार्क कोवी-२ या कोरोनाचा प्रसार करणाऱ्या विषाणुचा संसर्ग माणसामध्ये कसा झाला याची निःपक्षपाती तपासणी करावी असा ठराव आरोग्य संघटनेमधील सदस्य सभासदांनी मंजूर केला आहे. डब्लूएचओच्या वार्षिक सभेमध्ये हा ठराव सादर केला जाणार आहे. या ठरावाच्या बाजूने भारताने मत नोंदवत या ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे. भारताने पाहिल्यांदाच युरोपीयन महासंघ आणि ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेल्या या ठरावाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. जगभरामध्ये चीनमधील वुहान येथून प्रादुर्भाव झालेल्या या व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक जणांनी आपले नाहक जीव गमावले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेमध्ये बदल आणि अधिक पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये झालेल्या जी-२० परिषदेमध्येच व्यक्त केले होते. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संसर्गाबद्दल सुरुवातील माहिती लपवणाऱ्या चीनने नंतर हा व्हायरस चीनमध्ये इतर प्रदेशातून आला असलण्याची शक्यताही बोलून दाखवली होती. तर अमेरिकन सैन्यामुळे चीनमधून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्याचे तर्क चीनच्या परदेश मंत्रालयाने मांडले होते.

चीनबद्दल जागतिक आरोग्य संघटना आणि महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळे या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने झाल्याच्या आरोप केला जात आहे. इथोपियामधील घेब्रेयेसुस हे माजी मंत्री आहेत. चीनने २०१७ साली पाठिंबा दिल्याने त्यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकपदी निवड झाली होती. चीनविरोधातील आरोप घेब्रेयेसुस आणि जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वादामधून डबल्यूएचओला देण्यात येणारा निधीही थांबवला आहे.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चौकशी करण्याच्या ठरावाला ६२ देशांनी पाठिंबा दर्शवला आहे. बांगलादेश, कॅनडा, रशिया, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रीका, तुर्की, युनायटेड किंग्डम, जपान या देशांचा यामध्ये समावेश असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या ठरावामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जगावर आलेले सर्वात मोठे संकट असणाऱ्या कोरोना व्हायरसकडे अधिक पारदर्शकपणे आणि जबाबदापणे पाहण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चीनचा तसेच वुहान शहराचा थेट उल्लेख या ठरावाच्या मसुद्यामध्ये नाही. पण या व्हायरसची उत्पत्ती कुठे झाली आणि त्याचा प्रादुर्भाव मानवामध्ये कसा झाला याची चौकशी करण्याची मागणी करणारा हा ठराव अप्रत्यक्षपणे चीनविरोधातच असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यासंदर्भात बरीच माहिती लपवून ठेवल्याचा आरोप अनेक बड्या देशांनी केला होता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी प्राण्यांच्या आरोग्यासंदर्भात काम करणाऱ्या जागतिक संघटना ओआयईबरोबर काम करावे असे या ठरावामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर या ठरावामध्ये कोरोनाचा मानवामध्ये संसर्ग कसा झाला यासंदर्भात वैज्ञानिक आणि एकत्रितरित्या काम करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. झुनॉटीक सोर्स म्हणजेच प्राणीशास्त्रानुसार या व्हायरसची उत्पत्ती कुठे झाली, त्याचा कोणत्या मार्गाने मानवामध्ये प्रादुर्भाव झाला, पहिल्यांदा याचा संसर्ग झालेले संभाव्य कोण आहेत या सर्वांसंदर्भात निःपक्षपाती तपासणी करण्यात यावी असे या ठरावामध्ये म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या साथीला दिलेल्या प्रतिसादातून काय धडा मिळाला, काय कमावले आणि काय गमावले यासंदर्भात विचार करण्यात यावा. त्यासाठी नि:पक्ष, स्वतंत्र आणि सर्वसामावेशक तपासाला सुरवात करण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी लवकरात लवकर पावले उचलावीत अशी इच्छाही या ठरावाच्या बाजूने असणाऱ्या देशांनी व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर घेतलेले निर्णय, त्यासंदर्भात त्यांची काम करणारी यंत्रणा किती प्रभावी होती याबद्दल तपास करावा. तसेच कशापद्धतीने कोरोनासंदर्भातील निर्णय घेण्यात आले याबद्दलही तपास व्हावा असे ठरावाच्या बाजूने असणाऱ्या देशांनी म्हटले आहे. डब्लूएचओला सर्व देशांनी त्यांच्या देशातील कोरोनासंदर्भातील सर्व माहिती आणि आकडेवारी आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पुरवावी. ही माहिती योग्य, सखोल आणि परिपूर्ण असे यावर सर्व देशांनी भर द्यावा असेही या ठरावामध्ये म्हटले गेले आहे.

आता या ठरावावर जागतिक आरोग्य संघटनेच्या या व्हर्चूअल बैठकीमध्ये कशापद्धतीने चर्चा होणार आहे याबद्दल अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अजेंडा या बैठकीसाठी ठरवलेले नाही. आज होणाऱ्या या बैठकीमध्ये हा ठराव मांडला जाणार असून ८.८ ट्रीलियनचा फटका जागतिक आर्थिक व्यवस्थेला बसला असून अनेक देशांनी कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी चीनविरोधात आपली नाराजी याआधीच उघडपणे व्यक्त केली आहे.

Leave a Comment