धक्कादायक शक्यता; देशातील १३.६ कोटी लोकांच्या रोजगारावर गदा


नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांमध्ये कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. त्याला आपला देश देखील अपवाद नाही. त्यातच या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत असणार आहे. पण या वाढवलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था देखील बाधित झाली आहे. दरम्यान, एका अहवालात कोरोनामुळे देशातील १३.५ कोटी लोक बेरोजगार होऊ शकतात आणि १२ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात अशी धक्कादायक बाब नमूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पैशाची आवक, खर्च आणि बचत यावरही विपरित परिणाम होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान इंटरनॅशनल मॅनेजमेंट कंस्लटिंग फर्म ‘आर्थर डी लिटिल’च्या अहवालात जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी कोरोना व्हायरसचे संकट घातक ठरू शकते. भारतातील १३.५ कोटी लोकांच्या रोजगारावर कोरोना व्हायरसमुळे गदा येऊ शकते, त्याचबरोबर १२ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अहवालात प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी होणार असून जीडीपीमध्येही मोठी घरसण होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिले आहे.

भारतातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून भारतात याची W शेप रिकव्हरी होईल. त्यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये २०२०-२१ या आर्थिक वर्षात १०.८ टक्क्यांची घट होईल. त्याचबरोबर जीडीपी वाढीचा दर २०२१-२२ या कालावधीत ०.८ टक्के असेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त भारतात बेरोजगारीचा दर ७.६ टक्क्यांनी वाढून ३५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे १३.६ कोटी लोकांच्या रोजगारावर गदा येईल आणि देशात बरोजगारांची संख्या १७.४ कोटीवर जाईल, असेही त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दारिद्र्य रेषेच्या कक्षेत १२ कोटी लोक येतील आणि ४ कोटी लोक अत्यंत गरीब होतील असे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांचे देखील या अहवालामध्ये कौतुक करण्यात आले आहे. पण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी धोरणे अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत आर्थर डी लिटिलचे भारत आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग पार्टनर बार्निक मित्रा यांनी सांगितले.

Leave a Comment