जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांवर; तर भारत 11 व्या स्थानी


मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरातील 212 देशांमध्ये थैमान घातले असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांहून अधिक झाला आहे. आज सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 17 हजार 077 वर पोहोचला होता. तर तीन लाख 12 हजारांवर कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या गेली आहे. तसचे जगभरातील 18,10,099 लोकांनी कोरानावर मात केली आहे. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाबाधित 90,648 रुग्ण, तर 2,871 बळी गेले आहेत.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 14,84,004 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 88,485 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत कोरोनामुळे 34,466 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,40,161 एवढी आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,563 लोकांचा मृत्यू झाला आहे. 276,505 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,763 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,24,760 एवढा आहे.

जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये कोरोनामुळे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकट्या अमेरिकेत 89 हजारांवर गेला आहे.

Leave a Comment