पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा संजय राऊत यांच्या मागणीला विरोध


मुंबई – जीवघेण्या कोरोना व्हायरससोबत देशासह राज्याची लढाई सुरु असून या महामारीच्या परिस्थितीवर अद्याप नियंत्रण मिळविण्यात आपल्या यश येत नसल्यामुळे आगामी काळात येणारी आव्हाने लक्षात घेता मुंबईतील वानखेडे स्टेडिअम क्वारंटाइन सेंटरसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत करताना ब्रेबोन स्टेडिअमदेखील ताब्यात घेतले जावे अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे.


याबाबत संजय राऊत यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, सर्व संसाधनांचा वापर कोरोनाशी लढा देण्यासाठी केला पाहिजे. त्यातच वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी ताब्यात घेण्याचा निर्णय योग्य असून त्यासाठी ब्रेबोन स्टेडिअमदेखील ताब्यात का घेतले जाऊ नये ? तिथे देखील योग्य सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांना संजय राऊत यांनी टॅग केले होते.


संजय राऊत यांच्या मागणीला विरोध करत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने आपण ताब्यात घेऊ शकत नाही. मैदाने ही मातीची असल्यामुळे पावसाळ्यात तिथे चिखल होऊ शकतो. टणक पृष्ठभूमीची गरज क्वारंन्टाइन सेंटरसाठी असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि आपण तशी करत आहोत. आता आदित्य ठाकरेंच्या या उत्तरामुळे वानखेडे मैदाना क्वारंटाइन सेंटरसाठी वापरले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तत्पूर्वी क्वारंटाइन सेंटरसाठी कोणतेही मैदानात ताब्यात घेतले जाणार नसल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही सांगितले आहे. दरम्यानच्या काळात महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडिअममध्ये व्यवस्था करता येईल का याची पाहणी करण्यात आली होती. पण वानखेडे परिसरातील स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला होता.

Leave a Comment