निर्मला सीतारमन यांच्या ‘ड्रामेबाजी’ला काँग्रेसचे प्रतिउत्तर


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजिवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहिर केले होते. त्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शेवटच्या टप्प्यातील आर्थिक मदतीची माहिती पत्रकार परिषदेत दिल्यानंतर काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसकडून सध्याच्या परिस्थितीत केली जाणारी टीका योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जाऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ड्रामेबाजी करत असल्याची टीका सीतारमन यांनी केली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या याच टीकेवर निशाणा साधला.


काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मजुरांची हतबलता तुम्हाला ड्रामेबाजी वाटते का? रस्त्यांवर अनवाणी चालणारे शेकडो मजूर तुम्हाला ड्रामेबाज वाटतात? तहान-भुकेसाठी चालत जाणे म्हणजे ड्रामेबाजी आहे का? अशा प्रश्नांचा भडिमार केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करत स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे बंद करा. ते मजूर आहेत, मजबूर नाहीत. श्रमिक आणि कामगारांचा अपमान करु नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. संवेदनहीन सरकारला सर्व मजुरांची माफी मागावी लागेल, असे सुरजेवाला म्हणाले.

मजुरांचे दु:ख वाटण्यासाठी राहुल गांधी त्यांच्याजवळ गेले होते. दु:ख वाटणे हा अपराध असेल तर आम्ही वारंवार हा अपराध करु. मूकबधिर सरकारला मजुरांच्या समस्येबाबत जागरुत करणे अपराध असेल तर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार तो अपराध करतील. आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज तर नाहीत, त्यांना जेव्हा मत हवे असते तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात, अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली.

Leave a Comment