सरकारने परवानगी दिल्यास जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौरा करण्यास तयार


नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांना कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत, त्याचबरोबर या व्हायरसमुळे क्रिडा क्षेत्राला देखील फटका बसला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. यातच जुलै महिन्यातील प्रस्तावित दौरा खेळण्याची विनंती श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला केली होती. यावर बीसीसीआयने भारतीय संघ जुलै महिन्यात केंद्र सरकारने परवानगी दिल्यास श्रीलंकेचा दौरा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी भारतीय संघाला क्वारंटाइन सुविधा तयार करुन देण्याची तयारी दाखवली आहे. तसेच या दौऱ्यातील सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यासही श्रीलंकन क्रिकेट बोर्ड तयार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

केंद्र सरकार आगामी लॉकडाउन संदर्भात काय निर्णय घेते आणि त्यासंदर्भात काय नियमावली असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना जर भारतीय संघाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार असेल तर आम्ही श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळण्यास तयार असल्याची माहिती दिली. भारतात पुन्हा एकदा क्रिकेट सुरु व्हावे यासाठी बीसीसीआयही प्रयत्नशील आहे. भारतीय खेळाडूंना कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात सरावाची परवानगी मिळते का याची चाचपणी बीसीसीआयचे अधिकारी सध्या करत आहेत. सर्व क्रिकेट बोर्डांना सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. श्रीलंकेचा दौरा भारतीय संघाने केल्यास लंकन क्रिकेट बोर्डासाठी हा दौरा आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरणार आहे.

Leave a Comment