१८ मे पासून पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागात अधिक प्रमाणात सुरु होतील उद्योग-व्यवसाय


पुणे – मुंबई पाठोपाठ शैक्षणिक नगरी असलेल्या पुणे शहरात देखील कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. पण त्यात दिलासादायक बाब म्हणजे मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरात आढळणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ती ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण ही रुग्णसंख्या सध्या कोरोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत सुमारे ५ हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यावेळी म्हणाले, काल अखेरपर्यंत पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ९३ एवढा होता. त्यांपैकी १ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्यामुळे पुणे शहरातील अनेक रूग्णालयात सध्या ५० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे शहरात मे अखेरपर्यंत ५ हजार रुग्ण असतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. शहरातील रुग्णसंख्या भविष्यात जरी वाढत राहिली तरी त्यावर मात करणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक राहणार आहे. ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची आहे. दरम्यान, जिल्ह्यात कालपर्यंत १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आपल्या सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही आयुक्त गायकवाड म्हणाले.

दरम्यान कोरोनाचा सर्वाधिक फटका पुणे शहराच्या मध्य भागाला बसला आहे. त्यामुळे १८ तारखेपर्यंत राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता कोणत्या भागात कोणत्या सुविधा द्यायच्या ते ठरविले जाणार आहे. तसेच उर्वरित शहरातील काही भाग अधिक प्रमाणात सुरू होण्याची शक्यता गायकवाड यांनी व्यक्त केली.

Leave a Comment