जगभरात कोरोनाचे थैमान; कोरोनाबाधितांचा आकडा 46 लाखांपेक्षा जास्त


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून परिणामी जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 46 लाखांहून अधिक झाला आहे. तर या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंती तीन लाखांहून जास्त लोकांनी आपले जीव गमावले आहेत. मागील 24 तासात जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 99,116 नवीन रुग्णांची भर पडले आहे, तर 24 तासात 5,050 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 3,08,642 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण 17,58,032 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाग्रस्त हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.

वर्ल्डोर्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर पोहचला आहे. भारतात कोरोनाचे सध्याच्या घडीला 85,784 रुग्ण, तर कोरोनामुळे 2,753 बळी गेले आहेत. तर जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाग्रस्त तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत.

अमेरिकेत 14,84,004 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 88,485 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,998 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तेथील कोरोनाबाधितांची संख्या 2,36,711 एवढी आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,459 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,74,367 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकडेवारीत इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,610 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 223,885 एवढा झाला आहे.

जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक लाखांच्यावर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये कोरानामुळे 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकट्या अमेरिकेत 88 हजारांवर गेला आहे.

Leave a Comment