मुंबई पोलिसातील आणखी एक अधिकारी कोरोनाचा बळी


मुंबई – राज्याभोवती कोरोना व्हायरसचा फार्स कमी करण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या कोरोना वॉरिअर्संना देखील या व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यातच आज मुंबई पोलीस दलातील आठवा बळी गेल्यामुळे पोलीस दलातील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताप आणि सर्दीमुळे शाहूनगर पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आजारी होते. दरम्यान, सायन रुग्णालयात त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. पण ते राहत्या घरातील बाथरूममध्ये आजच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मयत घोषित केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली.

आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील १,१४० पोलिसांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली असून यामध्ये १२० अधिकारी आणि १०२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांपैकी ८६२ पोलिसांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत, तर २६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात एकूण १० पोलिसांचा कोरोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. यांमध्ये मुंबई पोलीस दलातील ८ पोलिसांचा समावेश आहे.

Leave a Comment