कोरोनामुळे जगभरातील तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी गमावला आपला जीव


मुंबई : जगातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 लाखांच्या पार झाला आहे, तर या व्हायरसमुळे आतापर्यंत 3,03,345 जणांनी आपले जीव गमावले आहेत. तर मागील 24 तासात 95,519 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले असून 24 तासात 5,305 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात तीन लाख तीन हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 17 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32.53 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोरोनाचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळे 2551 बळी गेले आहेत.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेतील 14,56,745 जणांना कोरोनाची लागण झाली असून 86,900 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेमधील 33,614 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,33,151 एवढी आहे. तर स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,321 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,72,646 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 2,305 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,52,245 इतका आहे.

जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 86 हजारांवर गेला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 81 हजार 900 रुग्ण, तर 2649 बळी कोरोनामुळं गेले आहेत.

अमेरिकेतील 1703 लोकांनी गेल्या 24 तासात गमावले आहेत. एकूण बळींची संख्या 86 हजार 900 वर तर रुग्णांची संख्या 14 लाख 56 हजारांवर पोहोचली आहे. काल न्यूयॉर्कमध्ये 136 बळी गेले, तेथील मृतांचा आकडा 27 हजार 426 तर रुग्ण संख्या 3 लाख 53 हजारांवर गेली आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 9946 , मासाचुसेट्स 5482, मिशिगन मध्ये 4787, पेनसिल्वानिया 4294, इलिनॉईस 3928, कनेक्टिकट 3219, कॅलिफोर्निया 3041, लुझियाना 2417, फ्लोरिडा 1876, मेरीलँड 1866, जॉर्जिया 1544, टेक्सास 1258 आणि वॉशिंग्टनमध्ये 993 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.

गेल्या चोवीस तासात स्पेनने 217 लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 27 हजार 321 एवढा झाला आहे. इटलीत गेल्या चोवीस तासात कोरोनाने 262 लोकांचा बळी घेतला. काल रुग्णांची संख्या 992 ने वाढली असून इटलीत आता जवळपास 2 लाख 23 हजारावर रुग्ण आहेत. इंग्लंडने गेल्या 24 तासात 428 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तेथील बळींची संख्या 33 हजार 614 वर गेली आहे. तर फ्रान्सने काल दिवसभरात 351 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 27 हजार 425 बळी गेले आहेत.

रशियातील रुग्ण संख्या २ लाख ५२ हजारावर पोहचली असून काल दिवसभरात तिथे 93 बळी गेले. रशियात एकूण 2305 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 71 ची भर पडली. तिथे एकूण 6854 मृत्यू झाले आहेत तर रुग्णांची संख्या 1 लाख 14 हजारांवर पोहोचली आहे.

कोरोनामुळे बेल्जियममध्ये काल 60 मृत्यूमुखी पडले तेथील बळींचा आकडा 8903 एवढा झाला आहे. हॉलंडमध्ये काल 28 बळी घेतले तिथे एकूण 5590 लोक दगावले आहेत. ब्राझील 13993, कॅनडात 5472, टर्की 4007, स्वीडनमध्ये 3529, स्वित्झर्लंडने 1872, पोर्तुगाल 1184, इंडोनेशिया 1043, इस्रायल 265 तर सौदी अरेबियात 283 बळी कोरोनामुळं गेले आहेत. दक्षिण कोरियात काल 29 रुग्णांची भर पडली, एकूण रुग्ण 10 हजार 991 कोरोनाबाधित रुग्ण तिथे आढळले आहेत. काल एका मृत्यूची नोंद झाली. तर मृतांचा आकडा 260 झाला आहे. तर पाकिस्तानात रुग्णांची संख्या 35 हजार 770 च्या वर पोहोचली आहे, तिथे काल 9 बळी गेले, एकूण मृतांचा आकडा 770 वर पोहोचला आहे.

Leave a Comment