माझ्या वक्तव्याचा हेतुपूर्वक विपर्यास करणाऱ्यांवर मी कारवाई करणार


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. त्यांनी त्यावेळी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्याचबरोबर सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास देखील त्यांनी त्यावेळी व्यक्त केला. या पॅकेजमधील तरतुदींची तपशीलवार माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन देत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वाराज चव्हाण यांनी मोदींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर देशातील सर्वच देवस्थानचे सोने ताब्यात घेण्यासंदर्भात विधान केले होते. त्यावरुन, त्यांना अनेकांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तर चव्हाण यांना काही भाजप नेत्यांनीही टार्गेट केले होत. त्यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


मोदींच्या भाषणानंतर ट्विट करुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, यापूर्वीच मी बोललो होतो, २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची देशाला आवश्यकता असल्याचे म्हटले होते. तसेच, देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी एक उपायही सूचवला होता. देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने केंद्र सरकारने ताबडतोब कर्जाने ताब्यात घ्यावे. जागतिक गोल्ड काऊन्सिलच्या अंदाजानुसार देशात ७६ लाख कोटींच्या जास्त सोने आहे. हे सोने सरकारने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घेण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. ही सूचना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयाला देखील टॅग केले होते.


पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या या ट्विटनंतर काही भाजप कार्यकर्त्यांसह अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. आता याबाबत, स्वत: चव्हाण यांनी ट्विटरवरुन खुलासा केला आहे. मी देशातील सर्वच धर्मांच्या देवस्थानातील सोन्याबद्दल दिलेल्या सूचनेचे, काही भक्त मीडियाने विपर्यास वृत्तांकन केले. देशात सोने तारण योजना सन १९९९ मधील अटलबिहारी वायपेयी सरकारच्या काळातच सुरु करण्यात आल्याचे चव्हाण यांनी म्हटले. तर, २०१५ मध्ये मोदी सरकारने या योजनेचे नामांतर केले आहे. लोकसभेत अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, अनेक देवस्थानांनी त्यांचे सोने तारण ठेवले असल्यामुळे, माझ्या वक्तव्याचा हेतुपूर्वक विपर्यास करणाऱ्यांवर मी कारवाई करणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment