पुण्यासाठी धोक्याची घंटा! जिल्ह्यात एकाच दिवसात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित


पुणे : देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाच्या विळख्यात मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे सापडली आहेत. त्यातच आता पुणेकरांची चिंता वाढवणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. कारण पुणे जिल्ह्यात काल तब्बल 194 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाच दिवशी पुण्यात आढळलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3455 वर पोहचला असून गुरुवारी पुण्यातील कोरोनाचे 109 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यास काही दिवसच बाकी असताना पुण्यातील रुग्णसंख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये नव्या अधिसूचनेनुसार मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नव्हती. यामधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आल्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी आदेशित केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. तर रेड झोनमध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भागाचा समावेश आहे. त्यातून पुणे महानगर प्रदेश मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने तिसऱ्या टप्प्याची सुधारित नियमावली जारी करण्यात आली. त्यात नमूद केले होते की, केंद्र सरकारने राज्यातील 14 जिल्हे हे रेडझोनमध्ये समाविष्ट केले आहेत. याशिवाय राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका हद्द, पुणे महानगरप्रदेशातील सर्व महानगरपालिका व मालेगाव महापालिका हद्दीचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. यातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळण्यात आली असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत.

त्याचबरोबर ग्रीन व ऑरेंज झोनमधील खासगी कार्यालये 100 टक्के सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मुंबई (एमएमआर) व पुणे प्रदेश (पीएमआर) मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळता खासगी कार्यालये बंदच राहणार असून तेथील केंद्र व राज्य शासनाची कार्यालये ही 5 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तर इतर रेड झोनमधील शासकीय व खासगी कार्यालये ही 33 टक्के मनुष्यबळ वापरून सुरू राहतील, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. रेड झोनमधील कंन्टेंटमेंट झोन वगळता बाकीच्या सर्व झोनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील परवानगी मिळालेल्या उद्योग, औद्योगिक आस्थापनांनी 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीची अट पाळणे बंधनकारक आहे. हे सर्व कामगार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात राहणारे असावेत, त्यांच्या प्रवासासाठी डेडिकेटेड वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे किंवा ते आपल्या चार चाकी वाहनाने प्रवास करू शकतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment