२० लाख कोटींचे पॅकेज जाहिर करणाऱ्या मोदी सरकारचे विजय माल्ल्याकडून कौतूक


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे देशभरातील उद्योगधंदे बंद असल्यामुळे देशासमोर आता आर्थिक संकट उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी मंगळवारी देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. देशभरासह विदेशात देखील मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचे अनेकांनी स्वागत केले. यात आता सरकारच्या या पॅकेजबद्दल देशातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या विजय माल्ल्यानेही कौतूक केले आहे.

केंद्र सरकारने देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यांमुळे लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. देशाला हे पॅकेज या संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता.

नरेंद्र मोदींच्या या पॅकेजच्या घोषणेनंतर अनेकांनी त्याचे स्वागत केले. तर यावरून विरोधकांनी टीकाही केली होती. दरम्यान, भारतातील सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्ल्याने पॅकेजचे स्वागत करण्याचबरोबर मोदी सरकारचे कौतुक केले आहे. यावर विजय माल्ल्याने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी पॅकेज जाहीर केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. सरकार इच्छा असेल तर आवश्यक तितक्या नोटा छापू शकते. पण, सार्वजनिक बँकांचे १०० टक्के कर्ज परत करण्याची ऑफर देणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या मदत करू इच्छिणाऱ्याकडे सतत दुर्लक्ष केले पाहिजे का? माझी विनंती आहे की, कोणत्याही शर्थींशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा, असे विजय माल्ल्याने म्हटले आहे.

Leave a Comment