रेल्वे प्रशासनाची माहिती; ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द


नवी दिल्ली – ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा भारतीय रेल्वे प्रशासनाने केली असून ऑटोमॅटीक पद्धतीने ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द होणार असून प्रवाशांना या तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केले आहे. मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये समावेश आहे. ३० जूनपर्यंतची रेल्वे तिकिटे रद्द करण्यात आली असली तरी स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमिक विशेष ट्रेनची सेवा सुरुच राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एसी कोच तसेच स्लीपर कोचचीही व्यवस्था रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या विशेष मेल ट्रेन्समध्ये असणार आहे. वेटींगची सुविधाही या ट्रेनसाठी उपलब्ध असणार आहे. पण यातील तिकिटांची संख्या मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीवरुन चालवण्यात येणाऱ्या विशेष १५ पॅसेंजर ट्रेनची सेवा कायम राहणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. चालवण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन आणि मेल्समध्ये स्लीपर कोचमध्ये २०० पर्यंत तर वन एसीमध्ये २०, टू एसीमध्ये ५० तर थ्री एसीमध्ये १०० पर्यंत वेटींगची सुविधा देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला आणि वरिष्ठांसाठी चालवण्यात येणाऱ्या विशेष मेल ट्रेन्समध्ये विशेष डब्बा राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. पण तात्काळ आणि प्रिमियम तात्काळची सेवा या ट्रेनसाठी उपलब्ध नसेल.

लॉकडाउन सुरु झाल्यापासून रेल्वे प्रशासनाने जवऴपास ९४ लाख तिकीटे रद्द केली आहेत. रेल्वेने या मोबदल्यात प्रवाशांना एक हजार ४९० कोटी रुपये परत केल्याचे वृत्त पीटीआयने दिले होते. तर पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये रेल्वेने रद्द केलेल्या तिकीटांच्या मोबदल्यात ८३० कोटी रुपये परत केले होते. २२ मार्चपासून अत्यावश्यक माल वाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेची सेवा स्थगित करण्यात आलेली आहे.

रेल्वेने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार रेल्वेमार्फत सुरु करण्यात आलेल्या विशेष १५ ट्रेनसाठी दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी तिकिटे खरेदी केली आहेत. दिल्लीमधून मंगळवारी तीन ट्रेन परराज्यांमध्ये पाठवण्यात आल्या तर पाच राज्यांमधून दिल्लीच्या दिशेने ट्रेन रवाना झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. मंगळवारी सोडण्यात आलेल्या ट्रेनमधून आठ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

९० हजारहून अधिक प्रवाशांनी पुढील सात दिवसांसाठीच्या ट्रेन्ससाठी तिकिटांचे बुकींग केले आहे. रेल्वेने सोमवारपासून विशेष ट्रेन सुरु केल्या असून रेल्वेने यासंदर्भातील नवीन नियम जारी केले आहेत. प्रवाशांनी नवीन नियमांनुसार स्वत:चे जेवण, अंथरुण-पांघरुण आणण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वने प्रवास करण्याआधी प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याने गाडी सुटण्याच्या ९० मिनिटे आधीच स्थानकात पोहचण्याच्या सूचना प्रवाशांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप डानलोड करणे बंधनकारक आहे.

Leave a Comment