पंतप्रधान सहायता निधीतील 3100 कोटींचे वाटप


नवी दिल्ली : पंतप्रधान सहायता निधीतील 3100 कोटी रुपयांचे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी वाटप करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या फंडात स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान सहायता निधीतील 1000 कोटी रुपये देशाच्या कानाकोपऱ्यातील स्थलांतरित मजुरांसाठी खर्च केले जाणार आहेत. त्याचबरोबर याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी या रक्कमेचा वापर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी 20 लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंगळवारी देशाला संबोधित करताना घोषित केले आहे.

व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीतील जवळपास दोन हजार कोटी हे देण्यात येणार आहे. तर एक हजार कोटी हे प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी देण्यात येणार आहे. तर कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी 200 कोटी रुपये हे वापरण्यात येणार आहेत. 27 मार्च 2020 ला पंतप्रधान सहायता निधीची (पीएम केअर्स फंड) निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. यामध्ये संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री असे दोन अन्य सदस्य आहेत. यावेळी या मदतनिधीत आर्थिक मदत करणाऱ्या सर्व दानशूरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. यातील संपूर्ण निधी हा कोरोना व्हायरसच्या संकटात वापरण्यात येणार आहे.

50 हजार स्वदेशी बनावटीचे व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची या फंडाच्या निधीतून तब्बल दोन हजार कोटी खर्च करुन योजना आहे. कोरोना संक्रमित रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर्स वापरण्यात येणार आहे. या व्हेंटिलेटर्सचा केंद्र सरकार, राज्य सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या कोविड 19 रुग्णालयात वापर करण्यात येणार आहे. तर, स्थलांतरित मजुरांसाठी एक हजार कोटी हे वापरण्यात येणार आहेत. सध्या लाखो मजुर पायीच आपल्या घराकडे निघाले आहेत. यामुळे त्यांचे मोठे हाल होत आहे. खास या मजुरांसाठी या निधीचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूवर लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरु आहेत. आपल्या देशातही यावर प्रयोग सुरू आहेत. यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी या फंडाची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ट्विट करत सांगितले होते की, देशभरातील लोकांनी कोरोनविरोधीत लढाईत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Comment