मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना मोदी यांनी देशात कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले असून नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले पॅकेज मला पर्याप्त वाटत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. त्याचबरोबर २० लाख कोटी हे रोखीने खर्च करणे अपेक्षित आहेच त्याचबरोबर याचा अमेरिकेतील लेंडिंग आणि स्पेंडिंग धोरणानुसार विचार करणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी यावेळी नोंदवले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेली मदत पॅकेजमध्ये गृहित धरली जाऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदींनी जाहिर केलेल्या पॅकेजचे राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
जीडीपीच्या ११ टक्के अमेरिकेने, जपानने १० टक्के, तर जर्मनीने २२ टक्के एवढे आर्थिक पॅकेज जाहीर केल्यामुळे २०४ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताने १० टक्के खर्च करणे अपेक्षित होते. त्यात आता लोकांना विश्वास देणे आवश्यक आहे. जरी पुरवठा झाला तरी मागणी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्याला देशातील अर्थव्यवस्थेचे चक्र फिरते ठेवायचे असेल तर ते पैसे कामगार, शेतकऱ्यांच्या खिशात वेळेत पोहोचणे गरजेचे असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या कंपन्यांकडे कामगारांना देण्यासाठी पैसे नाहीत. कामगारांना टिकवायचं असेल तर त्यांना थेट आर्थिक मदत करण्याची गरज आहे. त्याचबरोबर लघु उद्योगांना देखील चालना मिळणे आवश्यक आहे. केंद्राचे पैसे थेट लोकांच्या खिशापर्यंत कसा पोहोचवायचा याचा देखील विचार झाला पाहिजे. यासाठी ग्रामीण भागात मनरेगा चांगला मार्ग आहे. मनरेगासारखा मोठा कार्यक्रम शहरी भागात देखील राबवता येऊ शकतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी मत नोंदवले आहे.