देशातील कोरोना बाधितांचा आकडा 74 हजार 281, तर आता 2415 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशभरातील कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच असून देशात मागील 24 तासांत 122 लोकांनी आपला जीव गमावला आहे, 3525 नव्या रुग्णांची भर पडली आहे. या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत 1931 जणांनी कोरोनावर मात केली असून हा आकडा आतापर्यंत एका दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा सर्वाधिक आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा आतापर्यंत 74 हजार 281 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 2415 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 24 हजार 385 रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक 921, गुजरातमध्ये 537, मध्यप्रदेशात 225, पश्चिम बंगालमध्ये 198, राजस्थानमध्ये 117, दिल्लीमध्ये 86, उत्तर प्रदेशात 82, आंध्रप्रदेशमध्ये 46, तामिळनाडूमध्ये 61, तेलंगणामध्ये 32, कर्नाटकात 31, पंजाबमध्ये 32, जम्मू-काश्मीरमध्ये 10, हरियाणात 11, बिहारमध्ये 6, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, ओडिशामध्ये 3, चंदीगढमध्ये 3, हिमाचल प्रदेशात 2, आसाममध्ये 2 आणि मेघालयमध्ये एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर 3.2 टक्के झाला आहे. तर रिकव्हरी रेट 32.82 टक्के एवढा आहे. 2.37% रुग्ण सोमवारपर्यंत आयसीयूमध्ये होते, तर 0.41 टक्के व्हेंटिलेटवर आणि 1.82 टक्के ऑक्सिजन सपोर्टवर होते. भारतात सध्या 347 सरकारी लॅब आणि 137 प्रायव्हेट लॅब्स आहेत, जिथे कोरोना तपासण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत एकूण 17,62,840 टेस्ट करण्यात आल्या आहेत. भारतात आता दररोज एक लाख टेस्ट करण्याची क्षमता आहे.

Leave a Comment