पंतप्रधानांना संपूर्ण माहिती द्यायची नसेल तर लाईव्ह येऊन देशाला का संभ्रमात टाकता?


मुंबई – कोरोना विरुद्ध लढ्यासाठी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना घोषणा केली. भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या अभियानाचा महत्त्वाचा हे पॅकेज एक भाग आहे. जीडीपीच्या 10 % हे पॅकेज असल्याची माहिती मोदींनी दिली होती. विविध स्तरावरून या घोषणेला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

मोदींचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे अनेकांनी म्हणत कौतूक केले आहे तर काहींनी मात्र हे केवळ आश्वासन असल्याचे म्हणत त्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पॅकेज जाहीर केले पण त्याबाबत सविस्तर माहिती देण्याचे काम अर्थमंत्री निर्मला सीतारमण व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोपवले. मोदींना कठोर निर्णय जाहीर करताना कधीच पाहिलेले नाही, त्यांना जर पूर्ण माहिती द्यायची नसेल तर लाईव्ह येऊन देशाला का संभ्रमात टाकतात?असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायची नाही. त्यांनी हे सर्व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सोडून दिले आहे. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा. काही ठोस जर पंतप्रधानांना सांगायचेच नसेल तर ते लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण का करतात? असा सवालही त्यांनी केला आहे. अशा आशयाचे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मध्यम वर्गाला बळ देताना आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार दिसून आला. चौथ्या टप्प्यात देखील याचीच पुनरावृत्ती सुद्धा होणार आहे. तसेच 20 लाख कोटींचे पॅकेज संघटीत मध्यमवर्गासाठी जाहीर केले. पण असंघटीत आणि स्थलांतरीत कामगारांच्या हाती निराशाच आल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे.

Leave a Comment