अमित शहा यांची मोठी घोषणा; देशातील सर्व आर्मी कॅन्टीनमध्ये 1 जूनपासून केवळ स्वदेशी वस्तूच मिळणार


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेला संबोधित केले. त्याचबरोबर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वदेशी उत्पादनांवर जास्त भर देण्याचे लोकांना आवाहन केले. मोदींनी यासाठी Vocal for Local सांगत स्वदेशी वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करण्यास लोकानां सांगितले. गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या या आवाहनानंतर एक मोठी घोषणा केली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून अतिम शहा यांनी असे सांगितले आहे की, येत्या 1 जूनपासून सर्व केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. यामुळे 10 लाख केंद्रीय अर्धसैनिक दलातील सुमारे 50 लाख कुटुंबे केवळ 2800 कोटी रुपयांची देशी उत्पादने विकत घेतील.


अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी देशाला काल आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. जास्तीत जास्त स्वदेशी वस्तुंचा वापर करण्यास लोकांना सांगितल्यामुळे येणाऱ्या काळात भारत निश्चितच जगाचे नेतृत्व करू शकेल, असे सांगत शहा यांनी केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. अशी घोषणा केली.

अमित शहा यावेळी असेही म्हणाले की, जास्तीत जास्त देशातील बनवलेल्या उत्पादनांचा वापर करुन इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित करावे, असे मी आवाहन लोकांना करतो. प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते.

Leave a Comment