जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानाकडे नाही कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी रोख रक्कम


नवी दिल्ली – देशभरातील उद्योगधंद्यांसोबतच लॉकडाउनचा फटका धार्मिकस्थळांना देखील बसला आहे. सर्वच धार्मिक स्थळांचे दरवाजे जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे बंद करण्यात आले आहेत. त्यातच जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असणाऱ्या तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळासमोरही आर्थिक समस्या उभी राहिली असून विश्वस्त मंडळासमोर रोख रक्कमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न विश्वस्त मंडळासमोर उभा राहिला आहे. श्री वेंकटेश्वर मंदिराचा संपूर्ण कारभार तिरुमला तिरुपती देवस्थानकडून चालवला जातो. त्यातच सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे देवस्थानाचे ४०० कोटींचे नुकसान झाले आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वस्त मंडळाकडून लॉकडाउनमध्ये आतापर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन तसेच इतर ठरलेल्या गोष्टींवरील खर्च पकडून ३०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. सध्या विश्वस्त मंडळाकडे आठ टन सोने आणि १४ हजार कोटींची मुदत ठेव आहे. त्यानंतर आता विश्वस्त मंडळ त्यांना हात न लावता रोख पैशांची समस्या कशी सोडवता येईल याचा विचार करत आहे.

गेल्या ५० दिवसांपासून लॉकडाउनमुळे मंदिर बंद असून ते पुन्हा कधी सुरु होईल याचीही कोणती माहिती नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन तसेच इतर खर्चांसाठी तिरुमला तिरुपती देवस्थान बांधील आहे. आम्हाला लॉकडाउनमुळे खूप मोठा फटका बसला आहे. आमचा खर्च दरवर्षी जवळपास २ हजार ५०० कोटी एवढा असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानचे चेअरमन वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी दिली आहे. जिथे महिन्याला २०० ते २२० कोटींचा महसूल मंदिराला मिळत होता, तिथे आज काहीच मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात एरव्ही ८० हजार भाविक येत असतात. सणांच्या दिवसात ही गर्दी आणखी वाढते. पण सध्या भाविकांना परवानगी नसल्याने दैनंदिन पूजा आणि सण कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाविना केले जात आहेत. दर्शनाचे तिकीट, देणगी, प्रसाद सर्व काही बंद असल्यानेही मंदिराला आर्थिक फटका बसला आहे. पण असे असतानाही अशा संकटात विश्वस्त मंडळाकडून आरोग्य संस्थांना ४०० कोटींची मदत करण्यात आली आहे.

Leave a Comment