अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अधिक नोटा छापाव्यात, रघुराम राजन यांचा सल्ला


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पण या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद असल्यामुळे आगामी काळात त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अधिक नोटा छापाव्यात, असा सल्ला डॉ. रघुराम राजन यांनी दिला असून यामागे त्यांचे अर्थव्यवस्था नियमित राखण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हणणे आहे.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी सद्यस्थितीत देशाची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी नवीन नोटा छापणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. गरीब आणि अन्य कमकुवत आर्थिक घटकांना लॉकडाऊनचा सर्वाधित फटका बसला आहे. रिझर्व्ह बँक सर्वसाधारण परिस्थितीतही चलनीकरण करत असताना अधिक नोटा छापून आपल्या ताळेबंदी अहवालाचा विस्तार टप्प्याटप्प्याने करत असते. सध्याची परिस्थिती पाहता सार्वजनिक पातळीवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण अधिक असल्यामुळे आवश्यक तिथे रिझर्व्ह बँकेने खर्च करणे गरजेचे आहे. तरच, अर्थव्यवस्थेत पैसा फिरता राहू शकतो. खर्च करणे जर टाळत राहिले तर अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असे डॉ. रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

रघुराम यांच्या वक्तव्याचे अर्थतज्ज्ञ देवेंद्र कुमार पंत यांनीही समर्थन केले आहे. अर्थव्यवस्था कमकुवत होईल या भीतीने खर्च करायला टाळाटाळ करणे चूकीचे आहे. राज्य सरकारांसाठी केंद्र आणि केंद्रीय पातळीवरील बँक हे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. ते कर्जाऊ रक्कम देऊ शकतात. सध्या पैशाची निर्मिती करणे ही अत्यावश्यक बाब आहे. नवीन नोटा छापून त्या अर्थव्यवस्थेत आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, पैसे खर्च केल्यानंतरच ते अर्थव्यवस्थेत फिरते राहू शकतात. तसेच, अर्थव्यवस्थेचा एक मोठा आणि असंघटित घटक असलेल्या गरीब जनतेसाठी खर्च केला जाणे गरजेचे असल्याचे पंत यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment