कोरोनाच्या संकटात जगभरातील ९० पेक्षा जास्त देशांना भारताचा वैद्यकीय मदतीचा हात


नवी दिल्ली – जगभरातील अनेक देश सध्या कोरोना व्हायरस विरोधात लढाई लढत आहेत. त्यातच आपल्या देशातही कोरोनाचे संकट असताना देखील कोरोनाशी लढा देणाऱ्या जगभरातील अनेक देशांना वैद्यकीय सहाय्य करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. ९० पेक्षा जास्त देशांना ही वैद्यकीय मदत पुढच्या काही आठवडयात करण्यात येणार असल्याची माहिती हिंदुस्थान टाइम्सला या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी दिली आहे. भारताला या वैद्यकीय मदतीमुळे ११० ते १२० कोटीचा खर्च येणार आहे. भारत व्यावसायिक दृष्टीकोनातून आधीच काही देशांना वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करत आहे. त्यामध्ये ही अतिरिक्त मदत असणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली तेव्हाच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना जास्तीत जास्त देशांपर्यंत पोहोचण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सल्ला दिला होता. मोदी आणि जयशंकर शक्य तितक्या देशांपर्यंत पोहोचण्यासाठी फोनवरुन संपर्क साधत आहेत. तर पश्चिम आशियाई देशांवर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवैत आणि जॉडर्न या देशांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

तर या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ६७ देशांपैकी २९ देशांमध्ये वैद्यकीय साहित्य आधीच पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. वैद्यकीय साहित्य पोहोचवण्यासाठी नौदलाची सुद्धा मदत घेण्यात आली आहे. मालदीव, मॉरिशेस, सेशेल्स या हिंदी महासागर क्षेत्रातील देशांना आयएनएस केसरी या नौदलाच्या युद्धनौकेवरुन मदत पोहोचवण्यात येत आहे.

Leave a Comment