मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या चौघांनी भरला उमेदवारी अर्ज


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. राष्ट्रवादीकडून यावेळी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे देखील आज अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब, मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला होता. दीर्घ अनुभव असल्याने त्यांना संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. तर अमोल मिटकरी यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला देखील राष्ट्रवादीने संधी दिली आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या दोघांनीही आज अर्ज भरले. यावेळी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने मराठवाड्यातील दोन नवख्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानं चुरस निर्माण झाली होती. मात्र कॉंग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले आणि त्यांच्या एका उमेदवाराने माघार घेतली. कॉंग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत, अशी माहिती आहे.

Leave a Comment