सोशल मीडियातील आपल्या कारनाम्यांमुळे कायमच चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या विरोधात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईसह देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला असताना देखील मुंबईच्या रस्त्यावर अनेकजण विनाकारण भटकत असताना दिसत आहेत.
लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल
अशाच प्रकारे अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्यावर विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या नाकाबंदीमध्ये रविवारी संध्याकाळी पूनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद हा बीएमडब्ल्यू कारने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले.
त्यांच्याकडे विचारणा केली असता बाहेर फिरण्याबाबतचे योग्य कारण त्यांना देता आले नाही. यामुळे पूनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद विरोधात मरीन लाईन पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची गाडी देखील ताब्यात घेतली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.