महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ सेलिब्रिटींनी बदलले आपले डीपी


मुंबई : देशाभोवती कोरोनाचा विळखा अजूनही घट्ट होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यातच कोरोनाविरोधातील या लढाईत आपले कोरोना वॉरिअर्स अर्थात डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आपल्या जीवाची तसेच कुटुंबाची पर्वा न करता सेवा देत आहेत. कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरससोबत दोन हात करणाऱ्या या कोरोना वॉरिअर्सना देखील कोरोनाची लागण झाली आहे. या व्हायरसमुळे काहींनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहेत. अशा कोरोना वॉरिअर्सच्या सन्मानार्थ देशातील सेलिब्रिटी आता मैदानात उतरले आहेत. सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियाचा डीपी (DP) बदलून महाराष्ट्र पोलिसांचे बोधचिन्ह डीपी म्हणून ठेवले आहे.


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान करत आपला डीपी बदलला आहे. पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, क्रीडा आणि मनोरंजन जगातील सर्व मान्यताप्राप्त लोकांचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनापासून आभार मानले आहेत. भारतात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसागणित वाढ होत असल्या त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा हा मोठा प्रश्न आता राज्य करकार आणि केंद्र सरकारसमोर उभा राहिला आहे.

Leave a Comment