सोलापूरमधील १६ पोलीस कोरोनाबाधित


सोलापूर : देशासह राज्यात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतानाच सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी होण्यासाठी रस्त्यावर अहोरात्र पहारा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. एकमेकांच्या संपर्कातून सोलापूर जिल्ह्यातील १६ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून आणखी किमान शंभर पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कोरोनाची लागण झालेले हे १३ पोलीस कर्मचारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आहेत, तर तीन पोलीस कर्मचारी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील आहेत. यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन तथा कर्फ्यू लागू झाल्यानंतर देशासह राज्यातील पोलीस २३ मार्चपासून रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहेत. यापैकी काही पोलीस तर कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठेत १२ एप्रिल रोजी कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यापाठोपाठ रुग्णांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली आहे. शनिवारपर्यंत २८ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत १५६ वर जाऊ न पोहोचली आहे. यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त भाग बहुतांश दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टय़ांशी संबंधित आहे.

सोलापुरात एकमेकांच्या संपर्कामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असताना सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गेल्या आठवडय़ात कोरोनाबाधा झाल्याचे दिसून आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात हलवून त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली असता त्यापैकी आणखी दोन पोलिसांना कोरोनाबाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा नऊ पोलिसांना कोरोनाने ग्रासल्याचे आढळून आले. तर दुसरीकडे सोलापूर शहरातील तीन पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली असून यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या संपर्कातील शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात येत असून त्याचे निष्कर्ष अद्यापि समोर आले नाहीत. एकंदरीत पोलिसांना कोरोनाचा विळखा पडू लागल्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

सोलापुरात कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने वाढत असून काल एकाच दिवशी उच्चांकी ४८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यात नऊ पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाबाधा झाली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्या २६४ वर पोहोचली असून यात १४ मृतांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी सहापर्यंत कोरोनाशी संबंधित संशयित रुग्णांची वैद्यकीय चाचणी केलेले १३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४८ व्यक्तींना कोरोनाबाधा झाल्याचे दिसून आले. यात २९ पुरुष तर १९ महिला आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाची एकाचवेळी नऊ पोलिसांनाही बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यात सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील संजीवनगरासह गजानन नगर (जुळे सोलापूर), बजरंगनगर (होटगी रोड), सम्राट चौक, मंत्री—चंडक नगर (भवानी पेठ), रविवार पेठ, मुरारजी पेठ पोलीस वसाहत तसेच जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पाटकूल, ढोक बाभुळगाव आदी ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांचा समावेश आहे. काल नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक ८ रुग्ण सिध्देश्वर पेठेतील असून त्याशिवाय शनिवार पेठेत सात रुग्ण, तर लष्कर (सदर बझार) येथे चार रुग्ण सापडले. एकूण ३२ ठिकाणी रुग्ण सापडले. जिल्ह्यात ग्रामीण भागात मोहोळ व सांगोला येथे दोन कोरोनाबाधित रुग्ण यापूर्वी सापडले होते. त्यानंतर आता मोहोळ तालुक्यात पुन्हा तीन रुग्ण आढळून आले आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment