अपचन- घरच्या घरी असा मिळवा आराम


फोटो साभार समाचार नामा
माणसाची पचनक्रिया चांगली असेल तर त्याचे आरोग्य चांगले राहते. व्याधी उद्भवू नयेत किंवा रोगांचा शरीरात शिरकाव होऊ नये यासाठी पचनक्रिया व्यवस्थित असणे फार महत्वाचे असते. पचन बिघडले की अनेक व्याधी, आजार सुरु होतात. पचन बिघडण्यामागे अनेक कारणे असतात.

वेळीअवेळी अरबट चरबट खाणे, अति तेलकट, जड पदार्थांचे वारंवार सेवन, अपुरी झोप, पोट साफ न होणे, दीर्घ काळ काहीही न खाणे यामुळे अपचन होते आणि त्याचा परिणाम म्हणजे पोटात जळजळ, करपट ढेकरा, पोटदुखी, पोट फुगणे, उलटी, जुलाब अशी लक्षणे दिसू लागतात. थंडीच्या तुलनेत उन्हाळ्यात अपचन होण्याचे प्रमाण अधिक असते.


अपचन अति खाण्यापिण्यामुळे झाले असेल तर त्यावर काही घरगुती उपचार जरूर करावेत. त्याने बराच आराम मिळतो. उदाहरण द्यायचे तर अपचनाचा त्रास होऊ लागला की घरात वेलदोडा असतो त्याची कुटून पूड करावी आणि अर्धा चमचा पूड खडीसाखरेबरोबर घ्यावी. वेलदोडा पाचक आहे. तसचे तीन चिमटी जायफळ पूड आणि दोन चमचे लिंबू रस दररोज घेतल्यास ज्यांना नेहमी अपचन होते त्यांची समस्या दूर होते.

धने पूड आणि सुंठ यांचे मिश्रण पचनासाठी फार मदतगार ठरते. दोन चमचे धने पूड, अर्धा चमचा सुंठ दोन ग्लास पाण्यात घालून उकळून थंड करावे. हे पाणी २-२ चमचे तीन वेळा घ्यावे. त्याने पचन सुधारते. सुंठ आणि बडीशेप पचन सुधारण्यास मदत करणारे आहेत. पाव चमचा सुंठ, १चमचा बडीशेप आणि थोडी खडीसाखर सकाळ दुपार, संध्याकाळ चावून खावी.


पोट फार दुखत असेल तर ओवा तव्यावर भाजून चावून खावा त्यावर थोडे कोमट पाणी प्यावे. आल्याचा रस आणि सैंधव व थोडा हिंग यांचे चाटण करून ते घ्यावे. आल्याचे नुसते तुकडे चावून खावेत. हिंग पोट विकारांवर अतिशय उत्तम गुणकारी असून त्यामुळे गॅस कमी होण्यास मदत मिळते. हिंग कोमट पाण्यात घालून प्यावा किंवा पूड पोटावर चोळावी. सकाळी पिकलेले केले खाल्यानेही पचन सुधारते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment