देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 62 हजार 939 वर


नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांमध्ये थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशात देखील दिवसेंदिवस वाढत असून देशभरात मागील चोवीस तासांत 3 हजार 277 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर काल दिवसभरात कोरोनाने 127 जणांचा बळी घेतला आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 62 हजार 939 वर पोहचला आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 41 हजार 472 रुग्ण आणि उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 19 हजार 358 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 109 जणांचा समावेश आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे अधिक शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार अतिसौम्य-सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तर नमुना चाचणी न करताही डिस्चार्ज देण्यात येईल. फक्त गंभीर रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी तसेच अन्य वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे.

कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली होती.

Leave a Comment